राष्ट्रवादीकडून 288 जागांची चाचपणी; राज्यभरातून 875 अर्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

आघाडीतील जागा वाटप लवकरच निश्‍चित होणार 

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात राजकीय पक्षांची मजबूत आघाडी करतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभरातील विधानसभेच्या 288 जागांची चाचपणी रविवारी पुन्हा केली. दोन्ही कॉंग्रेस आणि अन्य पक्षांची ताकद पाहून जागा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला असून, त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आघाडीतील जागा वाटप निश्‍चित होणार आहे. 

दरम्यान, कॉंग्रेससोबत आता दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीची तयारी, इच्छुकांचे अर्ज आणि मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी या बाबींच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक पुण्यात झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ आदी या वेळी उपस्थित होते. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत पक्षाला मिळालेली मते आणि आजची स्थिती, या अनुषंगाने चर्चा करतानाच राष्ट्रवादीच्या ताब्यातील तसेच हमखास विजय मिळणाऱ्या जागांवरील हक्क न सोडण्याचा आग्रह काही नेत्यांनी बैठकीत धरल्याचे सांगण्यात आले. 

पाटील म्हणाले, ""कॉंग्रेससोबत जागा वाटपाची चर्चा असून, अन्य पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत. मनसेला आघाडीत घेण्याबाबत कॉंग्रेस अनुकूल असली, तरी त्याबाबतचा निर्णय झाला नाही.'' 

राज्यभरातून 875 अर्ज 
सर्व 288 जागांसाठी पक्षाने अर्ज मागविले आहेत. त्यासाठी 875 अर्ज आहेत. त्यानुसार येत्या 23 ते 25 जुलैदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. त्याची जबाबदारी नेत्यांकडे सोपविली असून, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मी स्वतः घेणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टमध्ये जागा वाटपाचे चित्र स्पष्ट केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Looking to Contest 288 seats 875 applications from across the state