राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तरुणाईसाठी जाहीरनामा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तरुण- तरुणींसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, रोजगार- व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, सांस्कृतिक, क्रीडा धोरणे, तरुणींच्या सुरक्षिततेसाठी "बीट मार्शल', शाळा- महाविद्यालये आदी घोषणांचा उल्लेख आहे. 

पक्षाने पहिल्यांदाच जाहीर केलेल्या या जाहीरनाम्याचे प्रकाशन शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, ऋषी परदेशी उपस्थित होते. "एनसीपी अँथम' आणि जाहीरनाम्याची संकल्पना राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा मनाली भिलारे यांची आहे. 

चव्हाण म्हणाल्या, ""तरुणाईसाठी हा जाहीरनामा तयार केला असून, यात विविध क्षेत्रांतील धोरणे मांडण्यात आली आहेत. शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच शहराबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरविण्याचे नियोजन केले आहे. या योजनांची अंमलबजावणी करताना तरुणाईशी संवाद ठेवला जाणार असून, त्यातून त्यांच्या गरजा जाणून घेण्यात येतील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांना विविध सेवा- सुविधा पुरविणे, शैक्षणिक केंद्रे उभारणे, याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा, यासाठी "विद्यार्थी कार्डस' योजना राबविण्यात येईल.'' मनाली भिलारे यांनी प्रास्ताविक केले, तर राकेश कामठे यांनी आभार मानले. 

तरुणाईला अपेक्षित असे काम करण्याचा आमच्या पक्षाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नियोजन केले आहे. तरुणाईला नेमकी दिशा देण्याचा जाहीरनाम्याचा उद्देश आहे. 
- प्रशांत जगताप, महापौर 

Web Title: ncp manifesto for youth