‘जलपर्णी’वरून राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

‘जलपर्णी’वरून राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

पुणे - जलपर्णीच्या निविदेचा मुद्दा महापालिकेतील विरोधी पक्षांनी पुन्हा उचलून धरला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल देण्यात महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी महापालिकेच्या दारात ठिय्या दिला. चौकशी समितीचा अहवाल द्या आणि दोषींना धडा शिकवा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. 

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या दारात जलपर्णी अंथरून या प्रकरणाचा निषेध केला. महापालिकेच्या तलावात जलपर्णी नसूनही ती काढण्यासाठी तब्बल २३ कोटी रुपयांची निविदा महापालिका प्रशासनाने काढल्याचे ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. ‘सकाळ’मधील वृत्तामुळे पुणेकरांचे २३ कोटी रुपये वाचले. दरम्यान, पुणेकरांसह महापालिकेतील विरोधी पक्षाने या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. त्याचवेळी महापौर मुक्ता टिळक यांच्या आदेशानुसार नेमलेल्या चौकशी समितीने दोन आठवड्यानंतरही अहवाल दिलेला नाही. त्यामुळे हे निविदा प्रकरण पुणेकरांची फसवणूकच करणारे होते, असे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर, नगरसेविका नंदा लोणकर, सुमन पठारे, पूजा कोद्रे,  नगरसेवक महेंद्र पठारे, प्रदीप देशमुख, नीलेश निकम, नितीन कदम, वासंती काकडे यांच्यासह पक्षाच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. येत्या २४ तासांत अहवाल न दिल्यास महापालिकेतील अधिकारी , पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर पडू दिले जाणार नाही, अशा इशारा तुपे यांनी दिला.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com