बारामतीत राष्ट्रवादी पुन्हा! विजयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, परंपरा... | Ajit Pawar on APMC Election result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Ajit Pawar

बारामतीत राष्ट्रवादी पुन्हा! विजयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, परंपरा... | Ajit Pawar on APMC Election

Baramati APMC Result: राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे आज निकाल लागले. यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ करत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीवरील १८ जागांपैकी सर्वच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"शेतकरी वर्गाने आम्हाला चांगला कौल दिला आहे, यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली आहे. बारामतीमध्ये प्रत्येक निवडणुकीत म्हणजे विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत ८० ते ८५ टक्के मत देण्याची जी परंपरा आहे ती मतदारांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन. शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळे मतदारांचे लाख लाख आभार" असं अजित पवार म्हणाले.

"बारामती मध्ये आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीने काम करतोय याची पोहोचपावती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली असून ही जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू" असंही पवार यावेळी माध्यमांना बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान, बारसू प्रकल्पाच्या आंदोलनासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, "कोणताही विकास प्रकल्प होणे गरजेचे असते पण मासेमारी उद्योगाची हानी आणि पर्यावरणाची हानी करून कोणताही प्रकल्प केला जाऊ नये."

टॅग्स :Ajit PawarNCPelection