नवीन चेहऱ्यांना देणार संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

पारदर्शकतेचे आश्‍वासन फोल
पारदर्शक कारभाराची हमी देत भाजप महापालिकेत सत्तेवर आले. ठेकेदारांमधील रिंग आणि निविदा प्रक्रियेशिवाय मर्जीतील ठेकेदारांना काम दिल्याने पारदर्शकतेचे बुरखा फाटला, असे अजित पवार यांनी म्हणाले. महापालिकेच्या कारभाराबाबत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे कात्रणही त्यांनी दाखविले.

पिंपरी - ‘काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल,’’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते शहरात आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेतही त्यांनी दिले. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, भाऊसाहेब भोईर, अतुल शितोळे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘भाजपने ‘स्मार्ट’ची ‘वेस्ट सिटी’ केली. स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. भाजपचेच नगरसेवक महापालिकेत कचरा आणून टाकत आहेत. प्रशासनावर त्यांचा वचक राहिला नाही. कचरा वाहतूक करणारी वाहने घेताना महिलांच्या उंचीचा विचार केला नाही. शास्तीकर आणि रेडझोनचा प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, आजही शास्तीकराच्या नोटीस येत आहेत. जे प्रश्‍न सोडविणे राज्य आणि केंद्र सरकारच्या हातात आहे, त्या प्रश्‍नांबाबत आमदार आयुक्‍तांशी चर्चा करत आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘शहरात पोलिस आयुक्‍तालय सुरू केल्याचे श्रेय भाजप घेत आहे. भाजप नगरसेविकेच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. स्थायी समितीच्या अध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला.

शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्याचे श्रेय आता कोण घेणार.’’
ते म्हणाले, ‘‘माथाडी कामगारांच्या नावाखाली उद्योजकांना धमकावले जात आहे. भंगाराच्या माफियांनी उद्योजकांना जेरीस आणले आहे. अनेक कंपन्या येथून निघून जात आहेत. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. शहरात मादक पदार्थांची विक्री वाढली असून शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यास बळी पडत आहेत. मात्र, पोलिसांचे त्याकडे लक्ष नाही.

प्राधिकरणातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्‍के परतावा देणार असल्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात. तर दुसरीकडे एवढ्या उशिरा परतावा कशाला द्यायचा, असा प्रश्‍न पालकमंत्री विचारत आहेत.’

टोलमुक्‍तीचे काय?
‘टोलमुक्‍तीचे आश्‍वासन भाजपने पाच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी दिले होते. त्याचे काय झाले?’’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. 

पवार म्हणाले, ‘‘तीन वर्षांपासून युतीचे सरकार शेतकऱ्यांना 
कर्जमुक्‍तीचे आश्‍वासन देत आहे. आताही ३१ ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दाखविलेले हे गाजर आहे. शिवसेना एकीकडे सत्तेत मांडीला मांडी लावून बसत आहे आणि दुसरीकडे पीकविम्यासाठी मुंबईत मोर्चा काढून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे नाटक करत आहे. विधानसभेच्या अधिवेशनात त्यांची दातखीळ बसते का?

भाजपने दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. पाच वर्षांत किती जणांना तो दिला याची आकडेवारी जाहीर करावी. मंदी आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यावर साडेचार लाख कोटींचे कर्ज झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पाच लाख कोटी रुपयांचे मार्केट कोसळल्याने अनेकांचे नुकसान झाले.’’

पवार म्हणाले, ‘‘राज्यात होणाऱ्या निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत. भाजप इतर पक्षांच्या नेत्यांना प्रलोभन दाखवून आपल्याकडे खेचत आहे. काँग्रेससोबत आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मागील निवडणुकीत जेथे ज्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याला ती जागा देण्याचे ठरले आहे. लोकसभेला मोदींची सुप्त लाट होती. मात्र, त्यांची ही छाप राज्यात दिसत नाही. यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला मोठ्या ताकदीने सामोरे जाणार आहोत.’’

‘बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या’
ईव्हीएमबाबत अनेक जणांनी शंका उपस्थित केली आहे. जगातील अनेक विकसित देशांमध्ये बॅलेटपेपरवर निवडणुका घेतल्या जातात. राजकीय नेते आणि नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी राज्यातही बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला हरकत नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Party Campaign Ajit Pawar Politics