Vidhan Sabha 2019 : सरकारबद्दलच्या विश्वासाला गेलाय तडा : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

देशातील अनेक लहान मोठ्या कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. लाखोंच्या नोकऱ्या जात असल्याने त्या-त्या भागातील व्यापारावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होत असून बेरोजगार वाढत आहेत.

सहकारनगर : 'दिवसेंदिवस देशातील प्रश्न वाढत चालले असून आर्थिक मंदीचे परिणाम संपूर्ण देशात दिसत आहे. देशातील आर्थिक मंदी घालविण्यासाठी आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी शासनाने पाऊले उचलणे आणि गुंतवणुकीसाठी विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, आज या विश्वासाला तडा गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,' अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली.  

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर येथे व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या शपथनामाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतोय 'सट्टाबाजार'?

पवार पुढे म्हणाले, 'देशातील अनेक लहान मोठ्या कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. लाखोंच्या नोकऱ्या जात असल्याने त्या-त्या भागातील व्यापारावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होत असून बेरोजगार वाढत आहेत. आज व्यापारामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यासाठी अभ्यासू सुशिक्षित आणि खऱ्या अर्थाने समाजाशी नाळ असणारे उमेदवार निवडून येणे, ही काळाची गरज झाली आहे. आपल्या भागातील विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाने अशाच प्रकारचे उमेदवार उभे केले आहेत. व्यापारी वर्गाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले.

- Video : दुचाकीस्वारांनो, आता संभाजी पुलावरुन निर्धास्तपणे जा कारण...

याप्रसंगी दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपट ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, उद्योगपती विठ्ठल मणियार, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्षपद फतेचंद रांका, खासदार वंदना चव्हाण, माजी खासदार रजनी पाटील, माजी आमदार मोहन जोशी, आघाडीचे उमेदवार अश्विनी कदम, रमेश बागवे, दत्ता बहिरट, चेतन तुपे, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

- Vidhan Sabha 2019 : असा आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुण्याच्या विकासाचा 'रोड मॅप'

मुकुंदनगर : शपथनामा प्रकाशन समारंभाप्रसंगी उपस्थित पर्वती विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार. उजवीकडून खासदार वंदना चव्हाण, उमेदवार अश्विन कदम, अरविंद शिंदे, रमेश बागवे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, रजनी पाटील, चेतन तुपे आदी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP President Sharad Pawar comment about State and Central Government