यापूर्वीही सहाचे साठ आमदार करून दाखवले : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

आमदार बाहेर पडत आहेत पण तरुण कार्यकर्ते तेवढ्याच उत्साहाने पक्षासाठी पुढे येत आहेत. या निमित्ताने तरुणांना अधिक संधी देता येईल.

पुणे : 'पक्षातील आमदार सोडून गेले, तर त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही. यापूर्वीही मी सहाचे साठ आमदार करून दाखवले आहेत,' असे आत्मविश्‍वासपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले. 

शरद पवार म्हणाले, '1980 च्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाचे साठ आमदार निवडून आलेले होते. त्यावेळी मी 15 दिवसांसाठी परदेशात गेलेलो असताना काही मंडळींनी सत्तेचे आमिष दाखवून फोडले होते. मी परत आलो तेव्हा माझ्याबरोबर फक्त 6 आमदार शिल्लक राहिले होते. त्यानंतर 1985 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा 6 चे 60 आमदार करून दाखवले होते.' 

आमच्यासाठी हा प्रकार नवीन नाही असे सांगून शरद पवार पुढे म्हणाले, 'आमदार बाहेर पडत आहेत पण तरुण कार्यकर्ते तेवढ्याच उत्साहाने पक्षासाठी पुढे येत आहेत. या निमित्ताने तरुणांना अधिक संधी देता येईल.' वैभव पिचड, सचिन अहिर अशी आपल्या अतिशय जवळ असणारी आणि कुटुंबाचे सदस्य म्हणविणारी माणसे दूर जात आहेत, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले, 'पक्षातील सर्वांनाच मी आपले मानतो. कुटुंबाचा एक भाग मानतो. जे गेले ते माझ्याशी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष बोलून गेले आहेत, पण कोणाच्याही जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडणार नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP President Sharad Pawar statement on NCP MLAs exit