Sharad Pawar : भाजपला पर्याय देण्याच्या प्रयत्नात माझाही सहभाग असेल - शरद पवार

बारामतीत माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी या बाबत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली
ncp Sharad Pawar will give alternative to BJP politics loksabha election baramati
ncp Sharad Pawar will give alternative to BJP politics loksabha election baramatisakal

बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पातळीवर विरोधकांची एकजूट होण्याची प्रक्रीया सुरु झालेली असताना मी बाजूला होणे योग्य नाही, असे अनेक मान्यवरांचे मत असल्यानेच आणि कार्यकर्त्यांची तीव्र भावना विचारात घेता मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय मागे घेतला, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

दरम्यान भाजपला पर्याय देण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात आपला सहभाग असेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीत माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी या बाबत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. ते म्हणाले, अध्यक्षपदाच्या भूमिकेपासून दूर जाण्यासाठी तयार झालो होतो, गेल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी लोकसभा, विधानसभा, राज्यसभा या पैकी कोठेतरी काम केले आहे.

देशात सातत्याने 56 वर्ष अशा पध्दतीने निवडून आलेले लोक मला तरी माहिती नाहीत, बारामतीसह राज्य व देशातील लोकांनी आशिर्वाद दिल्यानेच मी 56 वर्ष सक्रीय राजकारण करु शकलो. माझी अजूनही राज्यसभेची तीन वर्षे शिल्लक आहेत. गेल्या काही दिवसांपासून मला असे वाटत होते की आपण पर्याय तयार करणे गरजेचे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मीच जबाबदारी घेतो आहे, पण नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे व त्यांनीही जबाबदारी स्विकारली पाहिजे, असे मला वाटत होते, मी बाजूला होणे, याचा अर्थ घरीबसणे असा नाही, लोकांत, कार्यकर्त्यात राहण, त्यांचे प्रश्न सोडवण, हा मनाशी निश्चय करुन मी अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय घेतला होता.

पक्षाच्या कार्यकर्त्यांची इतकी तीव्र प्रतिक्रीया येईल, अस मला कधी वाटल नाही, हे मला कबूल केल पाहिजे, त्या बाबतीत माझा अंदाज चुकला, एक दोन दिवस कार्यकर्ते विरोध करतील, नंतर आपण समजूत काढू असा माझा अंदाज होता,

पण समजून घ्यायला कोणी तयार नव्हत, आसामपासून केरळपर्यंत सर्वच प्रमुख लोकांच्या प्रतिक्रीया आल्या, यातही वर्षभरात लोकसभेच्या निवडणूका आहेत, मी विरोधकांची एकी होताना मी बाजूला होणे योग्य नव्हते. अनेक मान्यवरांच्या मतांचा आदर राखून मी हा निर्णय घेतला.

अजित पवार यांच्याबाबत सातत्याने चर्चा होतात असे विचारले असता, सातत्याने चर्चा होतात हे बरोबर आहे पण कधी काय घडल आहे का...असा सवाल करुन पवार म्हणाले, काही लोक प्रचार करतात, काही लोकांच्या कामाच्या पध्दती असतात, मी वेळ असेल तेव्हा माध्यमांना वेळ देतो, अजित पवार यांचा फील्डवर काम करण्याचा अँप्रोच आहे, निर्णय घेण्याबाबतचा आहे,

तो काही मिडीया फ्रेंडली नाही हे मी तुम्हाला स्वच्छ सांगतो, काही लोक असे असतात की ते फक्त कामच करतात तर काही जण फक्त नावासाठी प्रयत्न करतात, अजित पवार यांना प्रसिध्दीची कधीच चिंता नसते तर हातात घेतलेले काम पूर्ण करण्याची त्यांना चिंता असते,

हा फरक आहे त्या मुळे त्यांच्या बद्दल असे होते, ते राष्ट्रवादीचेच काम करत असून राज्य व पक्षासाठी त्यांचे काम अतिशय उपयुक्त आहे, त्या मुळे त्यांच्याबाबत वेगळी चर्चा नको असे शरद पवार म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयातील निकाल जरी विरोधात लागला तरी सरकारवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही कारण भाजप व शिंदे सरकारकडे बहुमत आहे, त्या मुळे सरकारवर परिणाम होईल असे आपल्याला वाटत नसल्याचे शरद पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.

बारसू प्रकरणात शासनाच्या उद्योगमंत्री व प्रशासनासोबत माझ्याही दोन बैठका झाल्या आहेत, शेतक-यांच्या हिताची जपणूकही होईल आणि राज्याच्या विकासालाही चालना मिळेल असा मार्ग कसा काढता येईल, असा प्रयत्न होता, पर्यावरण व शेतीचे नुकसान न करता काय मार्ग काढता येईल, या साठी पूर्ण तयारी करुन स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. पोलिस बळ वापरुन प्रकल्प यशस्वी होणार नाही.

भाजपच्या पर्यायात माझाही सहभाग असेल...

कोणताही एक राजकीय पक्ष देशात पर्याय देऊ शकत नाही त्या मुळे अनेक पक्षांनी एकत्र येण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणावी लागेल, या बात नितिशकुमारांसह अनेक जण काम करत असून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर काम सुरु आहे. या सर्वांना मदत करुन प्रोत्साहन देण्याची गरज आहे, निवडणूकीच्या अगोदर भाजपला पर्याय उभा करता आला तर त्याची जास्त गरज आहे, आणि या कामात माझा सहभाग असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com