राष्ट्रवादीकडून "स्टार प्रचारकां'ची फौज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्‍यता मावळली असतानाच पुण्यातील सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे दीड डझन माजी मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना उतरविण्याचे नियोजन केले आहे. त्यात, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अन्वर, खासदार माजीद मेमन यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल या स्टार प्रचारकांचा सहभाग असणार आहे.

विरोधकांचे विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आव्हान असतानाच महापालिकेतील मित्र पक्ष कॉंग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्‍यता नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे. त्यानुसार पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असेही पक्षातील सूत्रांनी बुधवारी पुन्हा स्पष्ट केले आहे. दुसरीकडे प्रचारात आघाडी घेण्यासाठी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्याची व्यूहरचना आखली आहे. सर्वच घटकांमधील मतदारांवर प्रभाव पाडण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न राहणार आहे.

पवार, मुंडे आणि तटकरे यांच्या प्रत्येकी दहा ते बारा सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री फौजिया खान, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील या तरुण नेत्यांच्याही सभा होणार आहेत. दरम्यान, दोन किंवा तीन प्रभागांसाठी एका मोठ्या सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

शरद पवारांच्या सभांबाबत उत्सुकता
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महापालिका निवडणुकीत मॅरेथॉन सभा होतात. शहरातील वातावरण त्यातून ढवळून निघते. त्यामुळे पवार
या वेळी किती सभा घेणार याबाबत उत्सुकता आहे. सध्या तरी पवार यांच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे पाच सभा होतील, असे पक्षाच्या वतीने
सांगण्यात आले.

Web Title: NCP Star campaigner