राष्ट्रवादीला हवेत सहा मतदारसंघ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दिलेली साथ आणि मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांचे आकडे मांडून पुण्यातील आठपैकी सहा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच हवेत, अशी आग्रही मागणी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे शनिवारी केली.

पुणे : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दिलेली साथ आणि मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांचे आकडे मांडून पुण्यातील आठपैकी सहा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच हवेत, अशी आग्रही मागणी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे शनिवारी केली. परंतु, कॉंग्रेससोबत आघाडी राहणार असल्याचे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी इच्छुकांना सबुरीचा सल्ला दिला.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुकीची तयारी चालविली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण आदी नेते उपस्थित होते. पुण्यातून कोण आणि कुठच्या मतदारसंघातून इच्छुक आहे, याचा आढावा वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्या वेळी कोथरूड, हडपसर, खडकवासला, पर्वती, शिवाजीनगर, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी हात उंचावत हे मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले.

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीपासून आघाडी झाली असून, ती विधानसभेलाही कायम असेल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जागावाटपाची गणिते मांडली जात आहेत. त्यात अधिक जागा आपल्याकडे ठेवण्याचा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना युतीचे तगडे आव्हान असले, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांनी त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी बाह्या सरसावल्या असल्याचे इच्छुकांच्या यादीवरून स्पष्ट आहे. 
शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, ""विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत सहा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे या जागा लढण्याची आमची इच्छा आहे. या लोकसभा निवडणुकीतही पक्षाची कामगिरी उजवी ठरली आहे. त्याचा विधानसभेला फायदा होईल.'' 

कसबा मतदारसंघाचीही मागणी 

कसबा विधानसभा मतदारसंघातून एकाही पदाधिकाऱ्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली नाही. तरीही, हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे ठेवावा, याकडे चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या निवडणुकीत कसब्यातून कॉंग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP wants Six constituencies in Pune