पिंपरीत खचलेल्या ‘राष्ट्रवादी’ला उभारी | Election Results 2019

अविनाश म्हाकवेकर
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ मतदारसंघांमधील निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी आली. आता इतक्‍यात कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे पक्ष व कार्यकर्ते बांधणीसाठी भरपूर वेळ मिळाला आहे.

पिंपरी -  गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळाले नव्हते. शिवाय चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळची जागा जिंकता आली नाही. तसेच १५ वर्षे सत्ता असलेली महापालिकाही दोन वर्षांपूर्वी हातातून निसटली होती. साहजिकच कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले होते. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ मतदारसंघांमधील निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी आली. आता इतक्‍यात कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे पक्ष व कार्यकर्ते बांधणीसाठी भरपूर वेळ मिळाला आहे. या निकालाचा भाजप व शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. युतीतील बेबनाव व स्थानिक नेत्यांवरील रोष यानिमित्ताने उघड झाला आहे.

पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत अनुक्रमे गौतम चाबुकस्वार (शिवसेना), लक्ष्मण जगताप (भाजप), महेश लांडगे (सहयोगी भाजप) व बाळा भेगडे (भाजप) विजयी झाले. हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते, तरीही राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नव्हती. यानंतर तीन वर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रचंड अपयश आले. यातून बाहेर निघण्यासाठी म्हणून तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये शरद पवार यांचे नातू पार्थ यांना उभे केले, मात्र दारुण पराभव झाला. 

पहिली खेळी मावळची 
मावळ हा मतदारसंघ गेली २५ वर्षे भाजपचा गड आहे. निवडणुकीच्या तीन महिने अगोदर विद्यमान आमदार बाळा भेगडे यांना राज्यमंत्रिपद दिले. तरीही कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पक्षाने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आणि भाजपमध्ये बंडाळी माजली. हे अपेक्षित असल्यानेच राष्ट्रवादी यावर डोळा ठेवून होती आणि उमेदवारी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढच्या तासाभरात भाजपमधीलच तीव्र इच्छुक सुनील शेळके यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली. अखेर शेळके यांनी राज्यमंत्री भेगडे यांचा मोठ्या फरकाने पराभव करत ‘राष्ट्रवादी’ला पहिला विजय मिळवून दिला.

कलाटेंना पुरस्कृत केले
चिंचवडमध्येही असाच प्रयोग केला. त्यात यश आले नाही; पण भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुसाट गाडीला जरा ब्रेक तरी लागला. सुरवातीला जगताप यांच्यासमोर लढणार कोण, असा प्रश्‍न होता. परंतु, शिवसेनेचे नगरसेवक असलेले आणि नसलेलेही राहुल कलाटे यांना अपक्ष अर्ज भरण्याची प्रेरणा देत ‘आमचा पुरस्कृत उमेदवार’ असे जाहीर करून राष्ट्रवादीने मोठे पाठबळ दिले. याचा फायदा असा झाला की, जगताप यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या कलाटे यांना भाजपमधील नाराज गट, जगताप यांच्यावरील नाराजीची फळी, शिवसेनेतील सुप्त मदत मिळालीच शिवाय राष्ट्रवादीची ताकद मिळाली. भाजपला सोपी वाटणारी ही लढत अंतिम टप्प्यात घाम काढणारी झाली. त्यांना विजय मिळाला असला तरी मिळालेले मताधिक्‍य फारसे अभिमानास्पद नाही. कारण भाजपला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. शिवाय शहराध्यक्ष पदही त्यांच्याकडेच आहे. कलाटे यांनी टक्कर दिली असली तरी त्यांचे बॅट हे चिन्ह घराघरांत योग्य तऱ्हेने पोचले नसल्याचाही फटका बसला आहे. घड्याळ चिन्ह असते तर धक्कादायक निकालसुद्धा लागू शकला असता.

नाराजीचा फायदा मिळाला नाही
भोसरीमध्ये माजी आमदार विलास लांडे यांनाही पुरस्कृत करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. यामागील कारण म्हणजे भाजपने सहयोगी विद्यमान आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत मोठी नाराजी होती. तसेच लांडगे नकोत असाही एक गट होता. त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन मदत मिळेल असे गणित मांडून लांडे यांना पुरस्कृत केले. हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो आणि खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे असल्याने ही जागा मिळेल, अशी होती. या आडाख्यानुसार लढत तुल्यबळ असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला आणि ही जागा गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP will get a rise in pimpri