पुणे  जिल्ह्यात राष्ट्रवादीची मुसंडी | Election Results 2019

मंगेश कोळपकर 
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दणदणीत पुनरागमन करीत विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्‍याने विजय मिळविला,

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दणदणीत पुनरागमन करीत विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्‍याने विजय मिळविला, तर दिलीप वळसे पाटील यांनी सातव्यांदा सहज विजय मिळविला. भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे, शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव झाला; तर प्रतिष्ठेच्या इंदापूरमधील लढतीमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पराभूत झाले. 

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरूडमधून फक्त २५ हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. शिवसेना जिल्ह्यातून सपशेल हद्दपार झाली, तर विद्यमान आठ आमदारांनाही मतदारांनी घरी पाठविले.

पुणे हे राष्ट्रवादीचे ‘हेडक्वॉर्टर’ समजले जाते. यंदाच्या निवडणुकीत पक्षाने दमदार कामगिरी करून जिल्हा शरद पवार यांचाच बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. पुण्यावर वरचष्मा राखण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची फौज तैनात केली होती. पण, त्यांना समाधानकारक यश मिळाले नाही. काँग्रेसने शहर व जिल्ह्यात चांगली लढत देत आपली आणखी एक जागा वाढविली. तर, शिवसेनेचे विजय शिवतारे, सुरेश गोरे आणि गौतम चाबुकस्वार हे विद्यमान आमदार पराभूत झाले.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला बारामती, आंबेगाव आणि इंदापूरमध्ये विजय मिळाला होता. मात्र, या वेळी पक्षाने १० जागांवर विजय मिळविला. पक्षाने हडपसर आणि वडगाव शेरी हे बालेकिल्ले पुन्हा हिसकावून घेतले. गेल्या वेळी जिंकलेल्या ११ पैकी शिरूर, खेड-आळंदी, मावळ या जागा भाजपने गमावल्या, तर दौंडची जागा कायम राखली. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बारामतीमध्ये राज्यातील सर्वाधिक १ लाख ६३ हजारांचे मताधिक्‍य मिळवून आपणच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले. मावळमध्ये भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी ९३ हजार मतांनी पराभव केला. आंबेगावात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील सातव्यांदा विजयी झाले. इंदापूरच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांनी भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. पुरंदरमध्ये राज्यमंत्री शिवतारे यांचा काँग्रेसचे संजय जगताप यांनी पराभव करून मागच्या पराभवाचा वचपा काढला. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी ‘हॅट्ट्रिक’ केली. जुन्नरमध्ये विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचा राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांनी पराभव केला. शिरूरमध्ये आमदार बाबूराव पाचर्णे यांना त्यांचे परंपरागत विरोधक राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनी, तर खेड-आळंदीमध्ये आमदार सुरेश गोरे यांना राष्ट्रवादीचे त्यांचे परंपरागत विरोधक दिलीप मोहिते यांनी पराभवाची धूळ चारली. दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल आपली जागा राखण्यात यशस्वी झाले.

कोथरूडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे किशोर शिंदे यांचा पराभव केला. भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांना फक्त २५ हजारांचे मताधिक्‍य मिळाले. खडकवासल्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांनी भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना चांगली लढत दिली. मात्र, अवघ्या २६०० मतांनी तापकीर विजयी झाले. हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला. वडगाव शेरीत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विजयी झाले. भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी पर्वतीमध्ये ३० हजारांच्या मताधिक्‍याने विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. कसब्यात महापौर मुक्ता टिळक, शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे कॅंटोन्मेंटमध्ये सुनील कांबळे या भाजपच्या नगरसेवकांनी विधानसभेत मजल मारली. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला; तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांचीही ‘हॅट्ट्रिक’ झाली. भोसरीमध्ये महेश लांडगे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP won in Pune district