भुजबळ कुठेही जाणार नाहीत: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

येत्या लोकसभा निवडणूकीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, 'आघाडीसाठी 2004, 2009 नुसार जागा वाटप होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जुळी भावंडे आहेत. तर योग्य वेळी पुणे लोकसभेबाबत योग्य निर्णय होईल.'

खडकवासला (पुणे): नरेंद्र मोदींचा करिश्मा संपला असून, भाजपविरोधात जनमत तयार झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कुठेही जाणार नाहीत. पक्षाच्या मेळाव्याला ते येणार आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

पवार म्हणाले, 'पालघर मध्ये उमेदवाराची पळवापळवी झाली. तेथे समविचारी एकत्र आले असते तर पालघरचा निकाल आज वेगळा दिसला असता. विदर्भात विधान परिषदेला आमच्यातील मतभेदांमुळे पराभव झाला होता. पण लोकसभा निवडणूकीत एकत्र कामामुळे विजय मिळाला. भाजपसाठी एकसंघ राहिलेला विदर्भ आता राष्ट्रवादीकडे झुकला आहे. आगामी निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी आणि समविचारी पक्षांनी एकत्र काम करायला हवे.'

'भंडारा-गोंदियातील उमेदवारीबाबत राहुल गांधीवादी नाना पटोलेंची समजूत घातली, तेव्हा काँग्रेसची मोठी साथ मिळाली. पटोले यांनी कष्ट केले. शिवसेना स्वतंत्र लढणार म्हणतेय. पण भाजप नेते म्हणतात, युती करावी लागेल. याचाच अर्थ शिवसेना नसेल तर भाजपला विरोधात बसावे लागणार, हे भाजपला कळले आहे. म्हणून ते शिवसेनेला अधिक जागा देतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे हे भाजपमध्ये गेले याबद्दल बोलताना पवार म्हणाले, 'निरंजनला मी समजावून सांगितले होते. तू जे काही करतोय ते तुझे बाबा पाहत असतील. तुझ्या बाबांना पवार साहेबांनी खुप साथ दिली आहे. 24 वर्ष पवार साहेबांनी त्यांना आमदारकी दिली. त्यामुळे तू काही चूकीचे वागू नकोस. पण तरीही भाजपाच्या प्रलोभनांना निरंजन बळी पडला.'

येत्या लोकसभा निवडणूकीबाबत बोलताना पवार म्हणाले, 'आघाडीसाठी 2004, 2009 नुसार जागा वाटप होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जुळी भावंडे आहेत. त्यामुळे कोण छोटा-मोठा असे नाही. तर योग्य वेळी पुणे लोकसभेबाबत योग्य निर्णय होईल. पालघरमध्ये मत विभागणी झाली नसती तर चित्र वेगळे असते. पण भंडाऱ्यातील विजयाने आम्ही हुरळून जाणार नाही. पालघरमधील पराभवाचे नक्की चिंतन करू.' भाजप सत्तेत आल्यापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत, असा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत.

Web Title: NCPs party workers meeting at khadkvasla