पुण्यात भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुण्यात भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

पुणे : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची अडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा (एटीएमएस) पुढील पाच वर्षांसाठी ५७ कोटी ९४ लाख रुपये (कर अतिरिक्त) देण्याच्या प्रस्तावावर भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीने यू-टर्न घेतला. हा प्रस्ताव मुख्य सभेत मंजूर करताना भाजपसोबत हातमिळवणी करून हा प्रस्ताव मंजूर केला. शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली, तर एकाकी पडलेल्या काँग्रेसने विरोधात मतदान केले. यामुळे पुन्हा एकदा सोईच्या विषयासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र येत असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रुपयांच्या ‘एटीएमए’स प्रकल्पामध्ये महापालिकेने देखभाल दुरुस्तीचा खर्च उचलावा यासाठी पुढील पाच वर्षात ५८ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी मंजूर करण्यात आला. यामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था सुधारणार असल्याचा दावा भाजपने केला. दरम्यान, हे ५८ कोटी रुपयांचे काम

भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले असून, हा प्रस्ताव मंजूर केल्याने भाजपचे पदाधिकारी तिरुपतीच्या दर्शनाला चाटॅर्ड विमानाने गेल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याविरोधात पत्रकार परिषद घेतली होती. तसेच काँग्रेसच्या दोन गटांनी याचा स्थायी समितीमध्ये फेरविचार दिला आहे.

स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला तरी मुख्यसभेत या कडाडून विरोध होईल अशी अपेक्षा होती. पण हा विषय मंजुरीसाठी आल्यानंतर शिवसेनेचे व काँग्रेसने विरोध करत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती द्यावी अशी मागणी केली. या प्रस्तावास विरोध झाल्याने मतदान घेण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अचानक भाजपसोबत हात वर करत या प्रस्तावाला मान्यता दिली. तर विरोधात काँग्रेसच्या केवळ तीन जणांनी मतदान केले. शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत भाजपला अप्रत्यक्ष फायदा करून दिला.

शहरात २२५ सिग्नलवर यंत्रणा

महापालिकेला १२५ सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ५८ कोटीचा खर्च पाच वर्षात करायचा आहे. मात्र, मुख्यसभेत उपसूचना देऊन समाविष्ट गावातील १०० सिग्नलचा यात समावेश करण्यात आला.

विरोध करणारे नगरसेवक अनुपस्थित

सकाळपासून महापालिकेची मुख्यसभा सुरू असताना त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, नगरसेवक अरविंद शिंदे हे उपस्थित होते. मात्र, ‘एटीएमएस’च्या प्रस्तावास कडाडून विरोध करून भाजपवर घोटाळ्याचा आरोप करणारे हे प्रमुख नगरसेवक हा प्रस्ताव चर्चेला येण्यापूर्वीच सभागृहातून निघून गेले. त्यामुळे भाजला वाट मोकळी झाली.

‘‘स्मार्टसिटीच्या नावाखाली कोट्यावधीचे विषय मंजूर करून घेतले जात आहेत. त्याची माहिती देखील व्यवस्थित घेतली जात नाही. हा भ्रष्टाचार आहे.’’

- अविनाश बागवे, काँग्रेस

‘‘एटीएमएस प्रणालीमुळे शहरातील सिग्नल यंत्रणा सुधारणार आहे. स्मार्टसिटी संस्था जास्त काळ नसले त्यामुळे या सिग्नलचे देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेलाच करावे लागणार आहे.’’

गणेश बीडकर, सभागृहनेते

loading image
go to top