लष्करातील संधीचे सोने करा (व्हिडिओ)

1) मानवंदना स्वीकारताना बी. एस. धानोआ. 2) एनडीए (खडकवासला) - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील १३६व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाची गुरुवारी दिमाखदार सुरवात करताना विद्यार्थी. 3) दीक्षान्त संचलन सोहळ्यानंतर लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांबरोबर छायाचित्र काढताना
1) मानवंदना स्वीकारताना बी. एस. धानोआ. 2) एनडीए (खडकवासला) - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील १३६व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाची गुरुवारी दिमाखदार सुरवात करताना विद्यार्थी. 3) दीक्षान्त संचलन सोहळ्यानंतर लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांबरोबर छायाचित्र काढताना

पुणे - ‘लष्करातील सेवा ही केवळ एक व्यावसायिक संधी नाही, तर एक वेगळे आयुष्य जगण्याची संधी आहे. तिचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे,’’ असा सल्ला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी दिला.

‘एनडीए’तून उत्तीर्ण होऊन लष्करी सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत होते. धानोआ म्हणाले, ‘‘आधुनिक काळात युद्धपद्धतीत आमूलाग्र बदल होत आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे ही युद्धपद्धती बदलत आहेत. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा टप्पा एकीकडे वाढत आहे. तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, अण्वस्त्रे, जैविक आणि रासायनिक अस्त्रे दुसऱ्याबाजूला आहेत. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे गडद अंधारातही शत्रूवर अचूक हल्ला करण्याची क्षमता लष्करात निर्माण झाली, तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधून त्यातून संवाद वाढला. शत्रूच्या प्रत्येक बारीक-सारीक हालचालींवर बारकाईने नजर ठेवता येईल, अशी यंत्रणा विकसित झाली. हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम आहेत. 

या सर्वांतून युद्धाचे स्वरूप बदलले आहे. त्याची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात त्यातील गुंतागुंतही वाढत असल्याचे दिसते. अशा पार्श्‍वभूमीवर लष्करातील विद्यार्थ्यांनी सातत्याने अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. नवीन कौशल्ये शिकली पाहिजे.’

‘सारंग’ने फेडले डोळ्यांचे पारणे
‘एनडीए’च्या दीक्षान्त संचलनाच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील ‘सारंग’ हेलिकॉप्टरने चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकविला.

सुदान ब्लॉकच्या मागून भिरभिर हेलिकॉप्टर येताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या वेळी प्रत्येकाच्या नजरा निळ्याशार आकाशात खिळल्या होत्या. धूर सोडत वेगाने ‘सारंग’ची चार हेलिकॉप्टर सुदान ब्लॉकच्या समोरील आकाशात एक-एक कसरती दाखवू लागली. 

सुरवातीला या चारही हेलिकॉप्टरनी आकाशात ‘इंडिया फॉर्मेशन’ केले. हे ‘फॉर्मेशन’ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती.

हवेतल्या हवेत गिरकी घेणे, आकाशात सरळ उंच भरारी मारणे, प्रचंड वेगाने एकमेकांसमोर अशा प्रकारे ही हेलिकॉप्टर येत होती, की आता ती धडकणार, असा विचार मनात येईपर्यंत ती व्यवस्थित एकमेकांना ओलांडून पुढे तितक्‍याच वेगाने निघून जात होती. अशा अनेक कसरती या चार हेलिकॉप्टरच्या ‘टीम’ने सादर केली. हिंदुस्थान एअरोनॉटिक्‍स लिमिटेडने विकसित केलेल्या ‘ध्रुव’ या देशी बनावटीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘लाइट हेलिकॉप्टर’च्या माध्यमातून या कसरती सादर केल्या.

विमानांची जोरदार सलामी
चित्ता हेलिकॉप्टर आणि त्यानंतर आलेल्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील स्वनातीत वेगाने आकाशात भिरभिरणाऱ्या ‘सुखोई एमकेआय ३०’ या विमानांनी जोरदार सलामी दिली. अशा उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएचे दीक्षांत संचलन दिमाखात पार पडले.

कडक उन्हाचा संचलनाला फटका
शहर आणि परिसरात सध्या उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदला जात आहे.

अशा पार्श्‍वभूमीवर गुरुवारी सकाळीही ऊन जाणवत होते. अशातच संचलनाला सुरवात झाली. संचलन करीत पुन्हा जागेवर परत जात असतानाच तीन विद्यार्थी पडले. ते परत उठून संचलनात सहभागी झाले. दरम्यान, त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती देण्यात आली.

पांढऱ्या गणवेशाचा सुवर्णमहोत्सव
‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’च्या (एनडीए) उन्हाळ्यातील दीक्षान्त संचलनात पांढऱ्या गणवेशाच्या (व्हाइट पेट्रोल) वापरास पन्नास वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने हा गणवेश परिधान करून सर्वप्रथम संचलन केलेल्या ३६व्या तुकडीतील निवृत्त लष्करी अधिकारी १३६व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन पाहण्यासाठी गुरुवारी आवर्जून उपस्थित होते. 

‘एनडीए’मध्ये वर्षातून दोन तुकड्या उत्तीर्ण होतात. त्यातील एका तुकडीचे दीक्षान्त संचलन हे हिवाळ्यात होते. त्यात गडद निळा रंगाचा गणवेश परिधान केला जातो. तर उन्हाळ्यातील संचलनात पांढऱ्या रंगाचा गणवेश विद्यार्थी घालतात. ही परंपरा ‘एनडीए’च्या ३६व्या तुकडीपासून सुरू झाली.

ही तुकडी १९६९ मध्ये ‘एनडीए’मधून उत्तीर्ण झाली. त्यांनी सर्वप्रथम ‘व्हाइट पेट्रोल’ परिधान करून दीक्षान्त संचलन केले. या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे बरोबर पन्नास वर्षांनंतर १३६व्या तुकडीचे संचलन पाहण्यासाठी या तुकडीतील काही निवृत्त लष्करी अधिकारी आवर्जून उपस्थित होते. या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मेजर जनरल टी. पी. सिंग, ब्रिगेडियर एस. के. स्माइल, ब्रिगेडियर अजित आपटे, कर्नल सुधीर फड, कर्नल पी. डी. शिरनामे, कर्नल अशोक पुरंदरे, कर्नल भगतसिंह देशमुख यांचा समावेश होता. कर्नल सुधीर नाफड (निवृत्त) म्हणाले, ‘‘प्रबोधिनीमध्ये कालसापेक्ष बदल झाले; पण येथील परंपरा, संस्कार, वारसा हा जो त्याचा भक्कम पाया आहे, तो अद्यापही तसाच आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com