धक्कादायक! खडकवासला धरणाच्या पाण्याला लागून 8 हजार लिटर गावठी दारुचा साठा...

दुषित पाणी, घाण थेट पाण्यात; पोलीस सामील असल्याचा नागरिकांचा आरोप
pune crime
pune crimesakal

सिंहगड : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्याला अगदी लागून कच्च्या गावठी दारुने भरलेले तब्बल चाळीस पेक्षा जास्त प्रत्येकी दोनशे लिटरचे बॅरल आढळून आले आहेत.

या ठिकाणी अनेक वर्षांपासून राजरोसपणे गावठी दारुची भट्टी सुरू असून पोलीसांना याबाबत माहिती असताना 'जाणीवपूर्वक' कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ओसाडे (ता. वेल्हे) गावच्या हद्दीत पुणे-पानशेत रस्त्यापासून केवळ पन्नास ते शंभर मीटर अंतरावर खडकवासला धरणाच्या पाण्याच्या कडेने डोंगर कपारीत गाडलेले कच्च्या गावठी दारुचा साठा असलेले एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस बॅरल आढळून आले आहेत व आणखी असण्याची शक्यता आहे.

धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या वेळी अगदी पाण्याला लागून दारु उकळण्याचे काम सुरू असते अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. या दारु विक्रेत्यांची परिसरात दहशत असल्याने व पोलीसही त्यांना सामील असल्याने आजपर्यंत भीतीपोटी आम्ही कोणालाही सांगितले नाही अशी माहिती स्थानिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.

ज्या ठिकाणी ही दारुची भट्टी आहे तेथील परिसरात कुजलेल्या कच्च्या दारुची उग्र दुर्गंधी येत आहे. तसेच धरणाच्या पाण्यात व कडेने कोळशांचा खच पडलेला आहे. सांडलेले कच्च्या दारुचे रसायन, इतर घाण ही थेट पुणेकरांची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळत आहे.

हा एवढा गंभीर प्रकार पोलीसांच्या इतके दिवस कसा लक्षात आला नाही? पोलीसांना माहिती असेल तर कारवाई का झाली नाही? पोलीस सामील असतील तर कारवाई कोण करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आजूबाजूच्या गावांसह शहरातही पुरवठा?...... ओसाडे येथे आढळलेला गावठी दारुचा साठा हा तब्बल आठ हजार लिटरपेक्षा जास्त आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आजुबाजूच्या सर्व गावांमध्ये येथू गावठी दारुचा पुरवठा करुन विक्री केली जाते.

तसेच येथील गावठी दारुचा शहरातही पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 'कोणकोण' सामील आहे हे आता तपासातून बाहेर येते की खडकवासला धरणाच्या पाण्यात या भट्टीतून मिसळलेल्या घाणीप्रमाणे तपासही हरवून जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

"तातडीने संबंधित ठिकाणी पोलीसांची टिम पाठविण्यात आली असून कच्च्या गावठी दारुचा साठा नष्ट करण्याचे काम सुरू आहे. नागरिक जरी आरोप करत असले तरी याबाबत आम्हाला अगोदर माहिती नव्हती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असून संबंधितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार आहे." मनोज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वेल्हे पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com