Vidhan Sabha 2019 : घरापासून जवळचे मतदान केंद्र मिळणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये घरापासून दूरची मतदान केंद्रे मिळालेल्या मतदारांना दोन किलोमीटरच्या आतमधील मतदान केंद्र देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली. त्यासाठी जवळच्या मतदान केंद्रासाठी सोमवारी (ता. २३) व मंगळवारी (ता. २४) प्रशासनाकडे अर्ज करून बदल करता येणार आहे.

विधानसभा 2019 
पुणे - जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये घरापासून दूरची मतदान केंद्रे मिळालेल्या मतदारांना दोन किलोमीटरच्या आतमधील मतदान केंद्र देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली. त्यासाठी जवळच्या मतदान केंद्रासाठी सोमवारी (ता. २३) व मंगळवारी (ता. २४) प्रशासनाकडे अर्ज करून बदल करता येणार आहे.

अंतिम मतदार यादीमध्ये अनेक मतदारांना त्यांच्या घरापासून जास्त दूर असलेले केंद्र मिळाले आहे. त्यामुळे संबंधित मतदारांमधून संताप व्यक्त केला जात होता. मतदारांचा हा रोष कमी व्हावा, यासाठी घरापासून दोन किलोमीटरच्या आतील मतदान केंद्र देण्याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सूतोवाच केले होते. दरम्यान, रविवारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासमोर हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. त्या वेळी त्यांनी मतदारांबाबत असा प्रकार घडल्यास त्यांना दोन दिवसांमध्ये मतदान केंद्रामध्ये दुरुस्ती करता येईल, असे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मतदारांकडून वैयक्तिक पातळीवर तसेच विविध राजकीय पक्षांकडून आपापल्या मतदारसंघातील मतदारांच्या नावांची यादी पाहिली जात आहे. त्यामध्ये अनेक मतदारांना मतदानासाठी दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेले मतदान केंद्र दिले आहे. वृद्ध, महिला, दिव्यांग, दृष्टिहीन अशा वेगवेगळ्या मतदारांना त्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. ही बाब गृहीत धरून दूरच्या मतदान केंद्रांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन दुरुस्ती करण्यास समर्थता दर्शविली.

नावनोंदणीसाठी करा अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापासून दहा दिवस अगोदरपर्यंत मतदारांना मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येतो. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चार ऑक्‍टोबरपर्यंत मुदत आहे. त्यानुसार मतदारांना मंगळवार (ता. २४)पर्यंत नावनोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nearest polling station from home