खंडोबाचे सोमवती स्नान उत्साहात (व्हिडिओ)

तानाजी झगडे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

जेजुरीत सुमारे दोन लाख भाविकांकडून दर्शन; कुलधर्म-कुलाचारासाठी गर्दी

जेजुरी (पुणे): कऱ्हा नदीवर सोमवारी (ता. 16) खंडोबाचे सोमवती स्नान झाले. भाविकांनीही सोमवती स्नानाची पर्वणी साधली. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात कऱ्हेचे पात्र भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. सुमारे दोन लाख भाविकांनी यात्रेला हजेरी लावली. चैत्र अमावस्या असल्याने काल रविवारी व सोमवारी कुलधर्म कुलाचारासाठी गर्दी झाली होती.

जेजुरीत सुमारे दोन लाख भाविकांकडून दर्शन; कुलधर्म-कुलाचारासाठी गर्दी

जेजुरी (पुणे): कऱ्हा नदीवर सोमवारी (ता. 16) खंडोबाचे सोमवती स्नान झाले. भाविकांनीही सोमवती स्नानाची पर्वणी साधली. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात कऱ्हेचे पात्र भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. सुमारे दोन लाख भाविकांनी यात्रेला हजेरी लावली. चैत्र अमावस्या असल्याने काल रविवारी व सोमवारी कुलधर्म कुलाचारासाठी गर्दी झाली होती.

सोमवारी अमावस्या आली की जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भरते. आज सकाळी सात वाजून 26 मिनिटांपर्यंतच अमावस्या होती. त्यामुळे सुर्योदयानंतर व अमावस्या संपण्यापूर्वी खंडोबाचे कऱ्हा स्नान होणे आवश्‍यक होते. त्यासाठी मध्यरात्री दोन वाजता गडावरून खंडोबाची स्वारी निघाली. पेशव्यांनी इशारा देताच पालखी उचलण्यात आली. मध्यरात्र असूनही गडावर पालखी प्रस्थानाच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होती. भंडारा उधळून भाविकांनी खंडोबाचा जयघोष केला. यावेळी मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त राजकुमार लोढा, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे आदी उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी जागोजागी रांगोळी घालण्यात आली होती. अनेकांनी खांदेकरी मानकरी यांच्यासाठी चहा नाश्‍त्याची सोय केली होती. पालखी सहा वाजताच नदीवर पोचली. मात्र, सूर्योदयाची वेळ सहा वाजून सोळा मिनिटांची होती. त्यामुळे सुमारे वीस मिनिटांपर्यंत सूर्य उगविण्याची वाट पाहावी लागली. साडेसहाच्या सुमारास कऱ्हेच्या पाण्याने व दही दुधाने खंडोबाला स्नान घालण्यात आले. या वेळी भाविकांनी नदीत स्नान केले. भंडारा उधळून खंडोबाचा जयघोषही केला. नाझरे धरणात पाण्याचा साठा ठेवल्याने नदीच्या पात्रात पाणी टिकून राहिले. त्यामुळे भर उन्हाळ्यातही भाविकांना स्नान करता आले. त्यानंतर पालखी धालेवाडी कोरवड वस्तीच्या मार्गाने सकाळी साडेनऊ वाजता जानूबाई मंदिरात आली. रात्रीच्या वेळी पालखीचा प्रवास असल्याने मार्तंड देवसंस्थानने विजेची सोय धरणावर केली होती. रस्त्याची जागोजागी दुरुस्ती केली होती. खांदेकऱ्यांसाठी नाश्‍त्याची सोय केली होती. नदीवर आवश्‍यक तेथे बांबूचे संरक्षण उभारण्यात आले होते. स्नानाच्या ठिकाणी मंडप उभारण्यात आला होता. यावेळी पालखी सोहळ्यासाठी चांगल्या सोयी दिल्याबद्दल खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे यांनी मार्तंड देवसंस्थानचे विशेष आभार मानले.

उन्हाळ्यामुळे रात्रीच्या वेळी दर्शन
चैत्र अमावस्या असल्याने व जोडून सुटी आल्याने शनिवारपासूनच जेजुरीत भाविकांची गर्दी होती. काल व आज दिवसभर भाविक कुलधर्म-कुलाचार करीत होते. तळी भरणे, अभिषेक करणे, भंडार उधळणे, टाक उजळणे, जागरण घालणे आदी कार्यक्रम सुरू होते. कडेपठार मंदिरावरही भाविक दर्शनासाठी जात होते. रविवारी दिवसभर बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. पाणी मिळत नसल्याचे बस्थानकावरील भाविकांनी सांगितले. पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या कमी असल्याने बसस्थानकावर गर्दी झाली होती. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता. उन्हाळा असल्याने रसवंतिगृहे व शीतपेयाच्या दुकानांमधून गर्दी होती. कडक उन्हाळा असल्याने रात्रीच्या वेळीच भाविक दर्शनासाठी गर्दी करीत होते.

Web Title: Nearly two lakh devotees from Jejuri