भीती व द्वेषमुक्त भारत करण्याची गरज : फादर दिब्रिटो

भीती व द्वेषमुक्त भारत करण्याची गरज : फादर दिब्रिटो

वारजे माळवाडी : “देव आणि धर्माला मानणारा देश आहे. देशाची पाळेमुळे वेदांमध्ये असून, ती खोलवर रुजलेली आहेत. भेदाभेद अमंगळ आहे. काँग्रेस किंवा भाजपमुक्त देश करण्यापेक्षा भीती व द्वेष मुक्त भारत करण्याची गरज आहे”, असे मत 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन आज ज्येष्ठ नाटककार व 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या खासदार सुप्रिया सुळे, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख संयोजक दिलीप बराटे, काकासाहेब चव्हाण, चित्रकार सुनील देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे आणि पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

दिब्रिटो म्हणाले, की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चार सूत्रांच्या माध्यमातून घटना परिपक्व झाली आहे. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो. मात्र, आपल्या धर्मग्रंथाबरोबर संविधानही पूजनीय असले पाहिजे. या संविधानानेच सगळ्यांना मानाने जगण्याची शाश्वती दिली आहे. जोपर्यंत संविधान पद्धती भारतात आहे, तोपर्यंत कोणालाही भयभयीत होण्याचे कारण नाही. भारत हा सर्वधर्मांचे माहेरघर असून त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. सहिष्णूता हा भारतीयांचा धर्म असून असहिष्णूता हा अपघात आहे. भारतीय संवादी आणि समन्वयवादी भूमिका बाळगून असतात, त्यांना टोकाची भूमिका मान्य नाही.

साहित्यिक विचारवंतांची शारीरिक आणि वैचारिक हत्या केली जात आहे, हे खेदजनक आहे. कोणा एका व्यक्तीच्या पायाशी स्वाभिमान, अस्तित्व आणि विवेक गहाण न ठेवता साहित्यिकांनी वेळोवेळी भूमिका घेऊन आवाज उठवत, राजा तू नग्न आहेस, हे ठणकावून सांगितले पाहिजे. आज व्देषाचा विषाणू पसरवत त्याच सामान्य माणसाला जीवनीशी संपविले जात आहे. सहिष्णू भारतात गाय महत्त्वाची की, माणसे हे ठरवावे लागेल. या देशातील सामान्य माणूस हा लोकशाहीचा संरक्षक आहे. या सामान्य माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीवरच लोकशाही टिकून आहे. या मातीत साहित्य- संस्कृतीची बीजे पेरलेली असल्यानेच लोकशाहीच्या मंदिरात सरोगसी आणि ट्रान्सजेंडर्स यांसारखी बिले पारीत करून घेतली.

आगामी काळात राष्ट्रवादीकडून ट्रान्सजेंडर उमेदवारांना तिकीट देण्यासाठी मी आग्रही भूमिका घेईल. असे सांगून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “साहित्यातून संस्कार होतात पण ही पिढी दिवसेंदिवस साहित्य, भाषा यापासून दूर जात आहे. मराठी भाषेतील काही शब्द उच्चारताना आजही माझ्या अंगावर शहारे येतात आणि मराठी भाषेच्या गोडव्याची प्रचिती येते. आताची पिढी सोशल माध्यमांच्या भोवऱ्यात अडकली आहे. मराठी भाषा कानाला भावणारी आहे. आपली आणि उद्याची पिढी यांच्यात साहित्याची सांगड घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर फिरताना महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी लक्षात येते. नामवंत वाचनीय दैनिकातील अग्रलेखांची जागा आणि शब्दसंख्या मर्यादित झाली आहे.

प्रेमानंद गज्वी म्हणाले की, “प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवत घराबाहेर संविधान हाच आधार मानला पाहिजे. हिंदू राष्ट्राचा आग्रह धरला जात असल्याने संविधान मूल्यांना तडा जात आहे. संभ्रमित अवस्था निर्माण करून सामान्यांचा गोंधळ उडविण्याचे काम केले जात आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक- अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे यांनी केले, तर संचालक देवेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com