पंधरा अग्निशमन केंद्रांची गरज 

महेंद्र बडदे
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - केंद्र सरकारच्या स्थायी अग्निशमन सल्लागार समितीच्या निकषानुसार पुणे शहराचा विस्तार लक्षात घेता आणखी पंधरा अग्निशमन केंद्रांची आवश्‍यकता आहे. पाच केंद्रे उभारण्याचे काम सुरू असून, येत्या दोन ते तीन वर्षांत उरलेले केंद्र उभारले जातील, असा विश्‍वास अग्निशामक दलाला आहे. 

पुणे - केंद्र सरकारच्या स्थायी अग्निशमन सल्लागार समितीच्या निकषानुसार पुणे शहराचा विस्तार लक्षात घेता आणखी पंधरा अग्निशमन केंद्रांची आवश्‍यकता आहे. पाच केंद्रे उभारण्याचे काम सुरू असून, येत्या दोन ते तीन वर्षांत उरलेले केंद्र उभारले जातील, असा विश्‍वास अग्निशामक दलाला आहे. 

देशात 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत "अग्निशमन सेवा सप्ताह' साजरा केला जातो. यानिमित्त महापालिकेच्या अग्निशामक दलाचा आढावा घेतल्यानंतर माहिती पुढे आली आहे. शहराचा विस्तार होत असून, महापालिका हद्दीत नव्याने गावे समाविष्ट केली जात आहेत. नागरीकरण झपाट्याने होत असल्याने आणखी केंद्रे उभारण्याची आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्‍यक असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मनुष्यबळाची कमतरता, हा अग्निशामक दलाचा चिंतेचा विषय ठरला आहे. मान्य पदांपैकी निम्मी पदे रिक्त आहे. 

* शहराचे एकूण क्षेत्रफळ 243 चौरस किलोमीटर 
* पहिल्या 50 हजार लोकसंख्येला एक केंद्र आणि त्यानंतरच्या प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे एक केंद्र किंवा 5 किमीच्या परिघात एक, उपनगरीय आणि ग्रामीण भागात दहा किलोमीटरच्या परिघात 1 केंद्र असा निकष 
* सध्या 13 केंद्रे असून, गंगाधाम आणि जनता वसाहत येथे दोन केंद्रे बांधून तयार आहेत. निकषानुसार 30 अग्निशमन केंद्रांची आवश्‍यकता 
* धानोरी, काळेपडळ, हडपसर, धायरी-नांदेड, चांदणी चौक, दर्शन हॉल येथे केंद्र उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू; आणखी तीन जागांचे प्रस्ताव 
* मंजूर पदे 950, कर्मचारी संख्या 410, रिक्त पदे 540 
* एका केंद्राला एक गाडी, तीन चालक, तीन तांडेल, 15 जवान, एक अधिकारी असे मनुष्यबळ आवश्‍यक 

अग्नी सुरक्षा मित्र 
पोलिस मित्र किंवा वाहतूक नियंत्रणासाठी "ट्रॅफिक वॉर्डन' ही संकल्पना राबविली जात आहे. त्याचप्रमाणे "अग्नी सुरक्षा मित्र' ही संकल्पना पुढील काळात प्रभावीपणे राबविली जाणार आहे. महाविद्यालयीन युवक, युवतींना यात समाविष्ट केले जाईल. आगीच्या घटना किंवा आत्पकालीन परिस्थितीत जवानांना हे मित्र मदत करतील. 

अग्निशामक दल हे आत्पकालीन परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे. केंद्रीय समितीच्या निकषानुसार येत्या तीन वर्षांत केंद्रे उभी राहतील. राज्य अग्निशामक दल प्रशिक्षण संस्थेची शाखाही पुण्यात चालविली जाते. यातून मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. 
- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका 

Web Title: need for fifteen fire stations