‘हेल्थकार्ड’ची व्याप्ती वाढविण्याची गरज

YCM-Hospital
YCM-Hospital

पिंपरी - वायसीएममध्ये हेल्थकार्ड व पेशंट इन्फॉर्मेशन सिस्टीम केवळ बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागासाठी राबविली आहे. गुणवत्तापूर्ण उपचार व पारदर्शक कारभारासाठी या यंत्रणेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन व डॉक्‍टरांच्या उदासीनतेमुळे आंतररुग्ण, आपत्कालीन विभागासाह संपूर्ण रुग्णालयात लागू करण्यात आली नाही.

रुग्णालयातील केसपेपरपासून तपासणी, औषधे, विविध टेस्ट, एक्‍सरे आदी कामे या सिस्टीमच्या माध्यमातून चालत आहेत, त्यामुळे प्रत्येक रुग्णाची माहिती जतन केली जाते. संबंधित रुग्ण पुन्हा उपचारासाठी आल्यास त्याची अगोदरची पूर्ण माहिती डॉक्‍टरांना पाहता येते. तसेच, कोणती औषधे घेतली, एक्‍सरे व रक्त, थुंकी, युरिन आदी तपासण्यांची माहिती जतन राहते. मात्र, डॉक्‍टरांच्या कक्षाबाहेरील स्क्रीन बंद असून, औषधांसह अनेक अपडेट यामध्ये बाकी आहेत. २०१० मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी ही यंत्रणा वायसीएममध्ये सुरू केली. त्यानंतर आयुक्त श्रीकर परदेशी यांनी या यंत्रणेचे महाराष्ट्र मेडिकल कौंसिलमार्फत ऑडिट करून घेतले. संपूर्ण रुग्णालयासह इतर महापालिका रुग्णालयांत ही यंत्रणा सुरू करण्याचे त्या वेळी सुचवले होते. मात्र, वायसीएम प्रशासनाचे दुर्लक्ष व राजकीय उदासीनतेमुळे या यंत्रणेची व्याप्ती अद्याप झालेली नाही. 

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला ३० रुपये भरून हेल्थकार्ड मिळते. त्यानंतर रुग्णांच्या आजारानुसार डॉक्‍टरांच्या ओपीडीसाठी टोकन क्रमांक तयार होतो. पुढे संबंधित डॉक्‍टरांकडून तपासणी झाल्यानंतर रक्त किंवा इतर तपासणी, एक्‍सरे, सोनोग्राफी आदी तपासणी आवश्‍यक असल्यास त्या-त्या विभागाला पाठविले जाते. तपासण्यांचे अहवाल (रिपोर्ट) डॉक्‍टरांना त्यांच्या संगणकावरच दिसतात. त्यानंतर डॉक्‍टर निदान करून औषधे सांगतात. पुढे औषध खिडकीत रुग्णाच्या टोकन क्रमांकावर दिलेली औषधे दिली जातात. ही प्रक्रिया संगणकावर सर्व्हरच्या माध्यमातून होत असल्याने कुठेही पेपरचा वापर होत नाही. 

पारदर्शकता नकोशी 
रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला हेल्थकार्ड मिळाल्यानंतर प्रत्येक स्तरावरील माहिती या सिस्टीममध्ये साठवली जाते. रुग्णावर चुकीचे उपचार, चुकीची औषधे, महिन्याची ठरवून दिलेली ओपीडी न केल्यास, अचानक दांडी, ओपीडी सोडून गेल्यास, पकडले जाण्याच्या भीतीपोटी डॉक्‍टरांना ही यंत्रणा नकोशी वाटते. तर औषधे असून, रुग्णांना न दिल्यास किंवा इतर गैरव्यवहार केल्यास या सिस्टीममुळे अडकण्याची भीती असल्याने वैद्यकीय प्रशासन या यंत्रणेच्या व्याप्ती व अद्ययावतीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. 

रुग्णालयासाठी संगणक मिळाले असून, बंद स्क्रीन लवकरच सुरू होईल. सध्या सुरू असलेली संगणक प्रणाली आयपीडीसह संपूर्ण रुग्णालयात वापरण्याचे नियोजन आहे. 
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com