जुन्नरला पथ"दिव्या'खाली अंधार

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

जुन्नरला राज्य सरकारच्या किल्ले शिवनेरी परिसर विकास निधीतून करण्यात आलेल्या पदपथ व पथदिव्यांच्या कामाचा दर्जा व त्यासाठी झालेल्या खर्चाची मोठी चर्चा आहे. याबाबत शिवप्रेमींकडून शंका व्यक्त केली जात आहे. हे पथदिवे केवळ 10 ते 12 फूट उंचीचे असून त्याचा कोणताही प्रकाश पदपथालगतच्या रस्त्यावर पडत नसल्याने सरकारी निधी वाया गेला आहे. 90 दिव्यांपैकी काही दिवे हे सुरवातीपासूनच बंद अवस्थेत आहेत. दिवे कमी उंचीवर असल्याने काही दिवे नुकतेच फोडण्यात आले आहेत. या घोटाळ्याची चौकशीची मागणी केली जात आहे.

 

जुन्नर (पुणे) : जुन्नरला राज्य सरकारच्या किल्ले शिवनेरी परिसर विकास निधीतून करण्यात आलेल्या पदपथ व पथदिव्यांच्या कामाचा दर्जा व त्यासाठी झालेल्या खर्चाची मोठी चर्चा आहे. याबाबत शिवप्रेमींकडून शंका व्यक्त केली जात आहे. हे पथदिवे केवळ 10 ते 12 फूट उंचीचे असून त्याचा कोणताही प्रकाश पदपथालगतच्या रस्त्यावर पडत नसल्याने सरकारी निधी वाया गेला आहे. 90 दिव्यांपैकी काही दिवे हे सुरवातीपासूनच बंद अवस्थेत आहेत. दिवे कमी उंचीवर असल्याने काही दिवे नुकतेच फोडण्यात आले आहेत. या घोटाळ्याची चौकशीची मागणी केली जात आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वरसुबाई मंदिर या दरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीचा पदपथ करण्यात आला आहे. यालगत तीन महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेल्या तब्बल 90 पथदिव्यांचा खरेदीत आर्थिक घोटाळा झाला असल्याची शंका शिवप्रेमी व्यक्त करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना सकाळी व सांयकाळी चालण्यासाठी हा पदपथ करण्यात आला आहे. मात्र, रेलिंगचे कठडे आताच गंज पकडू लागलेत तर दिलेला रंग दर्जाहीन दिसून येत आहे. पादचारी मार्गाखाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटर केली आहे. मात्र, पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गटर कशासाठी केली हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. येथे तीन महिन्यांपूर्वी एक किलोमीटर अंतराच्या पदपथावर 90 दिवे लावण्यात आले. त्यातील एका दिव्याची किंमत 61 हजार 500 रुपये आहे. या दिव्यांच्या उभारणी व जोडणी करून लावण्यासाठी 55 लाख रुपये खर्च आला आहे.

पथदिव्याची किंमत नेमकी किती ?
एका पथदिव्याची बाजारातील किंमत 15 हजार ते 20 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते. तेच पथदिवे तब्बल 61,500 रुपयांना खरेदी करण्यात आल्याने परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे. जुन्नरचे तत्कालीन आमदारांनी मोठा गाजावाजा करून पदपथ तसेच पथदिव्यांच्या कामांची प्रसिद्धी केली होती. संबंधित यंत्रणेच्या खरेदीच्या आकड्याबाबत आता शंका निर्माण केली जात आहे. सुमारे सातशे मीटरच्या अंतरावर तब्बल 90 पथदिवे बसविण्यात आले असून दोन दिव्यांमध्ये केवळ 20 फूट अंतर असतानाही पुरेसा प्रकाश पडत नसल्याचे दिसून येत आहे, असे दिवे उद्यानात बसविण्यात येत असतात ते सुशोभीकरणाच्या नावाखाली पथदिवे म्हणून बसविले गेल्याची तक्रार होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need Inquiry In Street Lamp Work In Juuner