आगीविरोधात प्रतिबंधक उपायांची गरज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

आग लागण्याचे प्रकार

  • बंगले, सदनिका किंवा सोसायट्यांना लागणारी आग
  • दुकाने व गोदामांना लागणाऱ्या आगीच्या घटना
  • झोपडपट्टीसारख्या दाट लोकवस्तीमधील आग
  • फॅब्रिकेशन, कारखान्यांमधील आग
  • कचरा डेपोंना लागणारी आग

पुणे - मागील वर्षी तब्बल साडेतेराशे तर यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्येच शहरामध्ये आगीच्या तब्बल २७६ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणातील वित्तहानीबरोबरच पाच जणांचे जीव जाण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. घर, दुकाने, गोदामांच्या आगीपासून ते मोठमोठे कारखाने, कंपन्यांमध्ये लागणाऱ्या आगीसाठीही योग्य खबरदारी घेत आग प्रतिबंधक उपकरणे बसविल्यास आगीच्या घटना काही प्रमाणात रोखता येण्याची शक्‍यता अग्निशामक दलाने व्यक्त केली आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागातील इमारती, मोठमोठ्या झोपडपट्ट्या, उपनगरांमध्ये स्थलांतरित झालेली गोदामे, मध्यवस्ती व गर्दीच्या ठिकाणी असणारी विविध प्रकारची दुकाने, बाजारपेठ, बेकरी, वाडे, चित्रपटगृहे, गोडाऊनला आग लागण्याच्या घटना गेल्या चार-पाच महिन्यांत वाढल्या आहेत. उरुळी देवाची येथील आगीच्या घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. उर्वरित आगीच्या घटनांमध्ये अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोचल्यामुळे जीवितहानी टळलेली आहे, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची सद्यःस्थिती आहे.

या पार्श्‍वभूमीवर शहरातील आगीच्या घटना रोखण्यासाठी आता नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी निवासी क्षेत्रामध्ये व्यवसाय केले जात असल्याची सद्यःस्थिती आहे. याच ठिकाणी आग लागण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे संबंधित ठिकाणी पारंपरिक पद्धतीबरोबरच अद्ययावत आग प्रतिबंधक उपकरणे बसविणे, त्या उपकरणांची माहिती करून घेणे, आग पसरू नये, यासाठी आगीच्या उपकरणांचा वापर करणे, स्वतःसह इतरांनाही सुरक्षितरीत्या बाहेर काढणे, या स्वरूपाची माहिती नागरिक, संबंधित व्यावसायिक, कामगार, खासगी-सरकारी कंपन्यांचे कर्मचारी यांना असणे आवश्‍यक आहे. या पद्धतीने सतर्कता बाळगल्यास मोठी दुर्घटना सहज टळू शकते, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

काय काळजी घेता येईल 
अग्निशामक उपकरणे बसविण्यास प्राधान्य देणे 
अग्निशामक यंत्रणेचा वापर करण्याची माहिती करून घेणे
वाळूने आणि पाण्याने भरलेली बकेट ठेवणे 
सोसायट्या, मॉल्स, कारखान्यांचे ‘फायर ऑडिट’ करून घेणे  
शॉर्ट सर्किट होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करणे 
जुन्या वस्तू, कपडे व टाकाऊ वस्तू घरात न ठेवणे
निवासी सोसायट्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास मनाई करणे

शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात आगींचे प्रमाण वाढते. त्यास वेगवेगळी कारणे आहेत. नागरिकांनी स्वतःच्या जीवासाठी आग लागू नये, यादृष्टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर आग लागल्यास ती तत्काळ विझविण्यासाठी आग प्रतिबंधक उपकरणे बसविण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. छोट्या स्वरूपातील आग रोखण्यात यश आल्यास, आगीची तीव्रता वाढणार नाही. 
- प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशामक विभाग. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need for preventive measures against fire