भूस्खलनाचा धोका असलेल्या तळमाची वाडीचे पुनर्वसन झालेच पाहिजे : ग्रामस्थांची मागणी 

दत्ता म्हसकर
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

जुन्नर - भूस्खलनाचा धोका असलेल्या तळमाची वाडीचे पुनर्वसन झालेच पाहिजे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

सततच्या पावसामुळे येथील दौडया डोंगराच्या उतारावरील खासगी जमिनीतील अर्धा एकर क्षेत्रात मोठया भेगा पडल्या असून काही ठिकाणी भुस्खलन झाले आहे. येथे तहसीलदार रवींद्र सबनीस, मंडल अधिकारी डी.पी.माळी यांनी शुक्रवारी ता.24 रोजी सायंकाळी भेट देऊन पाहणी करून ग्रामस्थांसमवेत चर्चा केली.

जुन्नर - भूस्खलनाचा धोका असलेल्या तळमाची वाडीचे पुनर्वसन झालेच पाहिजे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

सततच्या पावसामुळे येथील दौडया डोंगराच्या उतारावरील खासगी जमिनीतील अर्धा एकर क्षेत्रात मोठया भेगा पडल्या असून काही ठिकाणी भुस्खलन झाले आहे. येथे तहसीलदार रवींद्र सबनीस, मंडल अधिकारी डी.पी.माळी यांनी शुक्रवारी ता.24 रोजी सायंकाळी भेट देऊन पाहणी करून ग्रामस्थांसमवेत चर्चा केली.

यावेळी पुनर्वसन झालेच पाहिजे, पुरेशी जागा उपलब्ध होईल अशी घरे असावीत, जी घरे बांधली आहेत त्या घरांची जागा पुरेशी नाही व घरें निकृष्ट दर्जाची आहेत. पुनर्वसनाची जागा योग्य नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.

भूस्खलनाची बातमी कळताच उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी गुरुवारी रात्री ग्रामस्थांशी मोबाईलवरून संपर्क साधून चर्चा केली होती.  

गावापासून पश्चिमेला सुमारे तीनशे मीटर अंतरावर भेगा पडल्याचे तसेच दोन ओढ्याच्या मधील काही भूभाग कमरेइतका खचला आहे. शुक्रवारी पावसाने उघडीप दिली.पोलीस पाटील ताई पांडुरंग साबळे व ग्रामस्थानीं याठिकाणी पडलेल्या भेगा व खचलेला भागाची पाहणी केली यावेळी साबळे यांनी पुनर्वसनाचे काम प्राधान्याने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सबनीस म्हणाले, पुनर्वसन रखडले आहे मात्र तेरा घरांचे काम पूर्ण झाले आहे ते निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार आहे या घराच्या मजबुती करणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयन्त करू तसेच आदिवासी विभागाच्या माध्यमातून काय करता येईल याबाबत संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढता येईल. पुनर्वसनाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येतील.

सततच्या पावसाने जमिनीत पाणी मुरून ती भुसभुशीत झाली आहे. यामुळे खडकावर असलेला मातीचा थर सरकला आहे. झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्या तर जमिनीला भेगा पडून त्यातून पाणी वाहत आहे. हा भाग वस्तीपासून दूर आहे.ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये.

पावसाळ्यात पडणाऱ्या कमी अधिक भेगा व जमीन खचण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. घरांना ओली येऊ लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भूजल सर्वेक्षण विभागाचा भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचा अहवाल आहे तर दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या गावात तळमाची वाडीचा समावेश आहे. येथील ग्रामस्थ गेली तेरा वर्षे पावसाळ्यात जीव मुठीत धरून राहत आहेत मात्र पुनर्वसनाचा प्रश्न काही सुटत नाही. अशा काही घटना घडल्यानंतर अधिकारी गावाला भेट देतात आपला अहवाल शासन दरबारी पाठवून देतात. प्रश्न मात्र तसाच कायम राहत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. 

Web Title: The need for rehabilitation of Talamachi wadi, which is at risk of landslides: Demand of villagers