कुशल व्यवस्थापकांची गरज वाढतेय

Jagdish-Pol
Jagdish-Pol

कुठल्याही शाखेतील पदवीच्या शिक्षणानंतर व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विविध पर्याय समोर असतात. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन’ (एमबीए) हा पर्याय व्यापार उद्योग क्षेत्रामधील करिअरच्या दृष्टीने सुयोग्य मानला जातो. व्यापार उद्योग, सेवा क्षेत्राची दिवसेंदिवस भरभराट होताना दिसत असून, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कुशल व्यवस्थापकांची गरज वाढत आहे, त्यासाठी एमबीएचा अभ्यासक्रम आवश्‍यक आहे.

कुशल व्यवस्थापक तयार करण्याची जबाबदारी देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या संस्था पार पाडत आहेत. एमबीए हा अभ्यासक्रम व्यवसाय, उद्योग क्षेत्रासाठी व्यवस्थापक निर्माण करणारा अभ्यासक्रम आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वत:च्या आवडीनिवडीनुसार शाखा निवडता येते. यामध्ये वित्त व्यवस्थापन (फायनान्स मॅनेजमेंट), विपणन व्यवस्थापन (मार्केटिंग मॅनेजमेंट), मनुष्यबळ व्यवस्थापन (ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट), प्रक्रिया व्यवस्थापन (ऑपरेशन मॅनेजमेंट), आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट), माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन (इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी मॅनेजमेंट), कृषी-व्यापार व्यवस्थापन (ॲग्री-बिझनेस मॅनेजमेंट), सेवाक्षेत्र व्यवस्थापन (सर्व्हिस सेक्‍टर मॅनेजमेंट), असे स्पेशलायझेशनचे पर्याय उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी हे स्पेशलायझेशनचे पर्याय निवडू शकतात.

सध्या एमबीएच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. ज्यांना संख्याशास्त्र, लेखाकर्म आणि वित्त व्यवहार विश्‍लेषणात आवड आहे, त्यांनी वित्त व्यवस्थापन हे स्पेशलायझेशन म्हणून निवडावे. तर मनुष्यबळ प्रक्रिया हाताळण्यात आणि मानवी वर्तन आणि त्याचे विविध अंगांनी व्यवस्थापन करण्यात विशेष रुची असलेल्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन हा पर्याय निवडावा. हा पर्याय निवडण्याकडे मुख्यतः: मुलींचा ओढा जास्त असतो. व्यवसाय कार्यप्रणाली विश्‍लेषण व्यवस्थापन (बिझनेस ॲनॅलेटिक्‍स मॅनेजमेंट) याला अलीकडे प्रचंड मागणी आहे.

‘एमबीए’चा अभ्यासक्रम मुळात एक निर्मितिक्षमता, नेतृत्वगुण धोरणात्मक व्यूहरचना विकसित करणारा आहे. याकडे पुस्तकी स्वरूपात किंवा फक्त पदवी प्राप्त करणे, या परंपरागत वृत्तीने न बघता व्यावहारिक स्वरूपाचा कौशल्ये विकसित करणारा अभ्यासक्रम म्हणून पाहावे. विविध तांत्रिक कौशल्यांबरोबरच उत्तम संभाषणकला, नेतृत्वकला यात शिकविली जातात.

देशातील एमबीए अभ्यासक्रमाचा पदवीधर हा स्थानिक व्यवस्थापक न राहता तो जागतिक व्यवस्थापक म्हणूनही कार्य करण्यास सक्षम असतो.

पुणे विद्यापीठाचा आणि राज्यातील बहुसंख्य विद्यापीठांचा अभ्यासक्रम हा २०१९-२० पासून संपूर्णतः: जागतिक स्तरावरील उद्योग, व्यवसायांच्या आव्हानांना विचारात घेऊनच तयार केला आहे. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम करिअर घडविणारा आकर्षक असा व्यावसायिक अभ्यासक्रम मानला जातो.

(लेखक महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे श्रीमती हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च फॉर विमेन, कर्वेनगरचे  संचालक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com