Loksabha 2019 : पर्यावरण रक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष : वंदना चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

गेल्या पाच वर्षांत सरकारने पर्यावरण रक्षणासाठी कोणत्याही उपयोजना न करता दुर्लक्ष केले. - वंदना चव्हाण

पुणे : वाढलेल्या जागतिक तापमानाच्या दुष्परिणामाचे चटके आता पुण्यालाही बसू लागले आहेत. दिवसागणिक ढासळणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आणि "ग्लोबल वार्मिंग'चे आव्हान थोपविण्याची जबाबदारी पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी घ्यावी, असे आवाहन खासदार वंदना चव्हाण यांनी रविवारी केले. "गेल्या पाच वर्षांत सरकारने पर्यावरण रक्षणासाठी कोणत्याही उपयोजना न करता दुर्लक्ष केले,' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

कॉंग्रेस आघाडीचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित निर्सगप्रेमी संस्था आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत चव्हाण बोलत होत्या. या वेळी सुजित पटवर्धन, प्रशांत कोठडिया, अन्वर राजन, गुलाब सपकाळ, सरोजा परुळेकर, सुदेष्णा घारे, सुरेश सातारकर, संदेश भंडारे आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाल्या, "सिमेंट क्रांक्रीटच्या जंगलात मोकळा श्‍वास घेणे अवघड झाले आहे. दमा, क्षय, कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. पुणे शहराच्या भोवतालच्या टेकड्या ही शहराची फुफ्फुसे आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने मागील पंधरा वर्षांत शहरातील पर्यावरणाचे संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. यालट मागील पाच वर्षांतील सरकारने केवळ घोषणा आणि आश्‍वासने दिली. परंतु, पर्यावरण रक्षणासाठी कोणतीही उपयोजना केली नाही.'' 

जोशी यांची भाजपवर टीका 
पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोहन जोशी म्हणाले, "उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. घटनेतील मूल्यांना भाजपने गेल्या पाच वर्षांत तिलांजली दिली. आंबेडकर आणि त्यांच्या तत्त्वांचा एवढा अवमान यापूर्वी कधीही झाला नव्हता. भाजपने केवळ तोंडदेखलेपणासाठीच आंबेडकरांचा वापर केला.'' 

सरकार उद्योगपतींचे एजंट : गायकवाड 
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मोदी सरकार हे अंबानी व अदानी यांसारख्या उद्योगपतींचे एजंट आहे. या सरकारला संसदीय लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समता व समाजवाद या तत्त्वांची ऍलर्जी आहे. वेगवेगळ्या नावाखाली या मंडळींना मनुस्मृती प्रस्थापित करायची असल्यामुळे भारतीय संविधानावर श्रद्धा असणाऱ्या सर्वच पुरोगामी व संवेदनशील नागरिकांनी मोदी-शहा यांचा कुटील डाव उधळून लावावा,'' असे आवाहन माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड यांनी वडगाव शेरी येथील मेळाव्यात केले. 

Web Title: Neglect of the government towards environmental protection Vandana Chavan