शाहिरांकडे आज दुर्लक्ष - पुरंदरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

पुणे - ‘‘शिवपूर्वकाळ आणि शिवकाळात महाराष्ट्र जागा करण्याचे काम शाहिरांनी केले. त्या काळात शाहिरांचा गौरव झाला; पण आज शाहिरांकडे दुर्लक्ष होत आहे,’’ अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. चित्रपट तयार झाला, तरच आपल्याला शाहिरांचे महत्त्व कळणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुणे महापालिकेचा ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ शाहीर हेमंत मावळे आणि लोककलावंत प्रभा शिवणेकर यांना महापौर मुक्ता टिळक आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, गोपाळ चिंतल उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘शाहिरांना कमी लेखू नका, भिकारीही समजू नका; त्यांच्यासोबत कीर्तनकार आणि प्रवचनकारांचाही मान ठेवा. शिवाजीमहाराज व पेशव्यांनी त्यांचा मान ठेवला होता व गौरवही केला होता. याचा विसर पडता कामा नये; पण शाहीर, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे महत्त्वच आज आपल्याला कळलेले नाही.’’

लोकशाहीर पठ्ठे बापूराव हे एक अजब रसायन होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार ही भाग्याची गोष्ट मानतो, अशा भावना व्यक्त करत मावळे म्हणाले, ‘‘शाहिरांसाठी स्वतंत्र सदन असावे. शहरात सध्या त्यांच्यासाठी हक्काची एकही जागा नाही. तसेच स्वतःचे घरसुद्धा नाही. धडपडणाऱ्या कलावंतांची दखल घेऊन पालिकेने त्यांना बळ द्यावे. ’’ दरम्यान, सीमा पाटील (शाहीर), पद्मजा कुलकर्णी (भारूड), वैशाली गांगवे, रेखा परभणीकर (नृत्यांगना), बुवा डावळकर, ज्ञानेश्वर बंड (ढोलकी), गोविंद कुडाळकर (तबला), आशाताई मुसळे, शकुंतला सोनावणे (गायिका), विठ्ठल थोरात (वगनाट्य) यांना गौरवण्यात आले.

Web Title: neglect to shahir