कुकडी नदीच्या वाळू उपसाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी : हजारो ब्रास अवैध वाळूचा उपसा कुकडी नदीतून होत आहे. याबाबत महसूल विभागाला अनेकवेळा तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. यातून महसूल विभागाची चांगलीच आर्थिक बांधणी झालेली दिसते. अशी चर्चा सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात आहे. जांबूत येथील सोशल मीडियाच्या ग्रुपवर तर याबाबत वाळूच्या आदर्शाची चर्चा सुरू आहे. 

टाकळी हाजी : हजारो ब्रास अवैध वाळूचा उपसा कुकडी नदीतून होत आहे. याबाबत महसूल विभागाला अनेकवेळा तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. यातून महसूल विभागाची चांगलीच आर्थिक बांधणी झालेली दिसते. अशी चर्चा सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात आहे. जांबूत येथील सोशल मीडियाच्या ग्रुपवर तर याबाबत वाळूच्या आदर्शाची चर्चा सुरू आहे. 

शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात घोड व कुकडी नदीतून आणि ओढ्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळूची उपलब्धता होत आहे. या परिसरात सरकारी लिलाव झालेला नाही. सध्या मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामांसाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्याबरोबर महसूल विभागाच्या कारवाईचा धसका वाळूतस्करांनी घेतला. त्यामुळे वाळूला लाख मोलाचा भाव मिळू लागला आहे. 

कमी श्रमात अधिक नफा होत असल्याने या अवैध वाळू व्यवसायाकडे तरूणवर्ग अधिक पडू लागला आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैध वाळू उपशावरून खून, मारामाऱ्या देखील झाल्या आहेत. त्यामुळे बहुतेक सर्वसामान्य नागरिक या अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष करताना दिसतो. नदी पात्रात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ देखील असा वाळूचा उपसा झाल्याने बंधारे धोकादायक झाले आहे. त्यातून या अवजड वाहनांची ये जा या कोल्हापूर पद्धतीच्या बंधऱ्यावरून होत आहे. या वाहतूकीमुळे कवठे-फाकटे बंधाऱ्याची भिंत कोसळली होती. या घटनेकडे देखील दुर्लक्ष होत असून अजूनही अशा बंधाऱ्यावरून वाळूची वाहतूक केली जात आहे. 

सध्या कुकडी नदीतून हजारो ब्रास वाळूचा उपसा दिवसाढवळ्या होत आहे. या बाबत सुजान नागरिक महसूल विभागाकडे तक्रारी करत आहेत. खरे तर याबाबत कामगार तलाठी यांनी महसूल विभागाला तक्रार करावयास पाहिजे. पण वाळू तस्कर ते महसूल विभाग ही साखळी मोठी भंयकर निर्माण झाली आहे. त्यातून महसूल विभागाने कारवाई केल्यासारखे करावयाचे व नंतर पुन्हा वाळू उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे.

अवैध वाळू उपसाबाबत तक्रारी व वार्तांकनामुळे अधिकाऱ्यांचा हप्ता वाढत असल्याची चर्चा आता गावागावामध्ये रंगताना दिसू लागली आहे. नुकत्याच एका युवकाने महसूल विभागाला कुकडी नदीतील वाळू उपशाबाबत तक्रार केली आहे. मात्र, तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्याने थेट प्रांत कार्यालयात याबाबत तक्रार दिल्याचे समजते. यावरून वाळू तस्कर व महसूल विभागीची आर्थिक साखळी घट्ट असल्याचे बोलले जात आहे. या नदीवर होणारा हा अवैध वाळूचा उपसा आता महसूल विभागाच्या कारवाईसाठी आव्हान ठरणार की काय अशी चर्चा रंगली आहे.

सोशल मिडीयावर वाळूचा आदर्श...

जांबूत ( ता. शिरूर ) येथे सोखल मीडियाच्या ग्रुपवर गेल्या आठ दिवसांपासून अवैध वाळू उपशाबाबत चर्चा रंगली आहे. त्यातून ग्रामस्थांनी वाळू उपसा थांबवावा असे आवाहन केले जात आहे. दुसऱ्याबाजूने वाळू उपसा होत नसल्याने गावाला बदनाम करू नका, असा संदेश दिला जात आहे.

काहींनी या विषयावर हास्यात्मक भूमिका मांडली असून, रोखठोक भाषेत पुरावे असतील तर कारवाई करू असाही सल्ला दिला जात आहे. सांसद आदर्श ग्राम असणारे गाव मात्र सध्या अवैध वाळूचा आदर्श घेत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: Negligence of the administration of the sand pond of the Kukadi river