चांद्रभूमीवरील माणसाचे पाऊल "पन्नाशीत'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

पुणे - वसुंधरा माणसाची आदिमाता..! अगदी उत्पत्तीपासून माणूस तिच्या अंगाखांद्यावर खेळतच वाढला. सूर्य तेजाने तिला प्रकाश आणि ऊब दिली, तर चांदोबाने शीतल माया. सूर्य म्हणजे साक्षात तेजाचा शक्तीपुंज, तर चंद्र म्हणजे प्रेमाचा कोमल स्पर्श. आजीच्या गोष्टीत आणि आईच्या अंगाई गीतांमधून डोकावणाऱ्या "चांदोबा'ला पाहत माणसांच्या कित्येक पिढ्या मोठ्या झाल्या. माणसं मोठी झाली, तरीसुद्धा चंद्र मात्र तेवढाच राहिला. आईच्या कुशीत आणि प्रेयसीच्या मिठीत गेल्यानंतरही तो प्रत्येकालाच हवाच असतो. कारण तो सर्वांचा लाडका चांदोमामा असतो. पृथ्वीवरून चंद्र पाहणाऱ्या माणसानं 20 जुलै 1969 रोजी इतिहास रचला. "अपोलो-11' या अंतराळयानाच्या माध्यमातून माणसाचं पहिलं पाऊल चांद्रभूमीवर पडलं. या ऐतिहासिक घटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला उद्यापासून (ता.20) सुरवात होते आहे.

चांद्रविजयानंतर माणूस आता सूर्याच्या दिशेने झेपावला असला, तरीसुद्धा संशोधकांच्या मनातील चंद्रकोर मात्र कायम आहे. नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रिन या अंतराळवीरांनी चांद्रभूमीवर मानवी अस्तित्वाचे ठसे उमटविले. भारतीय प्रमाणवेळेनुसार ती घटिका होती..! सकाळ आठ वाजून नऊ मिनिटे..! आर्मस्ट्रॉंग आणि आल्ड्रिन यांनी अंतराळयानातून चांद्रभूमीवर उतरताच कमी गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत चक्क उड्या मारल्या. चांद्रयानाच्या शिडीच्या तळाशी लावलेला टीव्ही कॅमेरा आर्मस्ट्रॉंग यांच्या हालचाली टिपत होता.

आर्मस्ट्रॉंग यांच्यापाठोपाठ वीस मिनिटांनी आल्ड्रिन चंद्रावर उतरले. या अभूतपूर्व घटनेनंतर आर्मस्ट्रॉंग यांच्या तोंडातून बाहेर पाडलेले.Thats one small step for man, one giant leap for mankind. हे वाक्‍य मानवी इतिहासात अजरामर ठरलं. या दोघांनीही वीस मिनिटांनी संदेशाची एक प्लेट आणि अमेरिकी निशाण चांद्रभूमीत रोवले. ""पृथ्वी ग्रहगोलावरील मानवांनी या ठिकाणी पहिले पाऊल ठेवले आहे, आम्ही मानवजातीच्या शांतीसाठी येथे आलो आहोत, '' असा विजयी संदेश त्यांनी दिल्यानंतर पृथ्वीवरील मानवाच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

त्या दिवशी काय झाले?
अध्यक्ष निक्‍सन यांची अंतराळवीरांशी दूरध्वनीवरून चर्चा
मुंबई नभोवाणी केंद्रावर घुमले विजयी पोवड्याचे सूर
अनेक धर्मश्रद्धांना तडा, नव्या विज्ञान युगाची सुरवात
"मिसेस आर्मस्ट्रॉंग' म्हणतात विवाहाचा क्षणच महत्त्वाचा
रशियाच्या "ल्युना- 15'चाही चांद्रभूमीला स्पर्श
महाराष्ट्रात शाळांना सुट्टी, वर्तमानपत्रांची अधिक दराने विक्री
आर्मस्ट्रॉंगचा "मून वॉक' रशियन टीव्हीवरही झळकला

1969 ते 1972 या काळात सहा वेळा चंद्रावर उतरला
12 अंतराळवीरांचा चांद्रभूमीला स्पर्श
3 देशांचे आतापर्यंत चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग

Web Title: neil armstrong moon