अबब...आमटीच्या मसाल्याचा खर्च साडेचार लाखांचा! (व्हिडिओ)

अर्जुन शिंदे
रविवार, 6 जानेवारी 2019

आळेफाटा : आणे (ता. जुन्नर) येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज (ता.६) व उद्या (ता.७) दोन दिवस पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी - भाकरी महाप्रसादासाठी लागणाऱ्या आमटीच्या यावर्षीच्या मसाल्याचा एकूण खर्च जवळपास साडेचार लाख रुपये असणार असून, हजारो भाविकांनी आमटी - भाकरी महाप्रसादाचा भुरके मारत आस्वाद घेतला

आळेफाटा : आणे (ता. जुन्नर) येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज (ता.६) व उद्या (ता.७) दोन दिवस पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी - भाकरी महाप्रसादासाठी लागणाऱ्या आमटीच्या यावर्षीच्या मसाल्याचा एकूण खर्च जवळपास साडेचार लाख रुपये असणार असून, हजारो भाविकांनी आमटी - भाकरी महाप्रसादाचा भुरके मारत आस्वाद घेतला.

या यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आण्याची आमटी या नावाने ही पारंपरिक चवीची आमटी प्रसिद्ध आहे. यावर्षीच्या आमटी महाप्रसादाचे भास्कर मोहना डोंगरे, लक्ष्मण धोंडिबा आहेर, रामदास गंगाधर गुंजाळ व बंधू, तसेच कै. गणपत बाळा आहेर यांच्या स्मरणार्थ बाजीराव गणपत आहेर हे दानशूर अन्नदाते आहेत.

एकूण  ३३ ते ३५ कढया तूरडाळ आण्याची आमटी बनविण्यासाठी ७५० किलो, ३३ तेल डबे, गुळ, शेंगदाणे, खोबरे -प्रत्येकी ३०० किलो, बेसनपीठ - २१० किलो, मीठ ५ गोणी तसेच लवंग, दालचिनी, जिरी - मोहरी, मिरी, खसखस, कर्णफुल, वेलची, तमालपत्र आदी मसाल्याचे पदार्थ एकूण १७२ किलो आदी साहित्य यावर्षी लागणार आहे. यासाठीच्या निव्वळ मसाल्याचा खर्च एकूण ४ लाख ५२ हजार ३५८ रुपये अपेक्षी असल्याचे श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी सांगितले.
 

यासाठी लागणाऱ्या बाजरीच्या भाकरी, गाव व परिसरातील ग्रामस्थ वाजतगाजत आणून देतात. आज रविवार (ता.६) व उद्या सोमवार (ता.७) दोन दिवसात हजारो भाविक आमटी - भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेतात. दरम्यान आज (ता. ६) दुपारी महाआरती व दानशूर अन्नदात्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, अतुल बेनके, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर खंडागळे, सत्यशील शेरकर, दीपक औटी, वल्लभ शेळके, देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर, सरपंच श्रीप्रकाश बोरा, डॉ. दीपक आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान जवळपास पुढील सन २०३० पर्यंतचे आमटी महाप्रसादाच्या खर्चाची जबादारी घेण्यासाठी अन्नदात्यांची प्रतीक्षायादी तयार आहे. याठिकाणी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पोलिसांच्या दिमतीला परिसरात जवळपास ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. तर आमटी - भाकरी वाटपाची जबाबदारी आणे येथील सरदार पटेल हायस्कुल, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी सांभाळली. येथील भक्तभवन इमारतीच्या तीनही मजल्यांवर आमटी - भाकरी महाप्रसादासाठी पंगतींची व्यवस्था असून, वरच्या मजल्यांवर आमटी नेण्यासाठी स्वयंचलित लिफ्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान  कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी, सूत्रसंचालन रामदास दाते यांनी, तर आभारप्रदर्शन सरपंच श्रीप्रकाश बोरा यांनी केले.
        
 

Web Title: Net Amount four and Half A lakh Rupees of Aamti