#forbetterpune : पुणेकर नेटिझन्स म्हणतात, 'जबाबदारी तर सगळ्यांचीच!'

टीम ई-सकाळ
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुण्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला काँक्रिटचे रस्ते, महापालिकेने अतिक्रमणांना दिलेलं अभय जबाबदार असल्याचं म्हटलयं. तर अनेकांनी महापालिकेबरोबरच सामान्य नागरिकांचीही तितकीच जबाबदारी असल्याचं म्हटलंय.

पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सूज्ञ पुणेकरांनी ई-मेलच्या माध्यमातून, तसेच ट्विटर आणि फेसबुकवर आपली परखड मते व्यक्त केली आहेत.

यात अनेकांनी या परिस्थितीला काँक्रिटचे रस्ते, महापालिकेने अतिक्रमणांना दिलेलं अभय जबाबदार असल्याचं म्हटलयं. तर अनेकांनी महापालिकेबरोबरच सामान्य नागरिकांचीही तितकीच जबाबदारी असल्याचं म्हटलंय.

ई-मेलवरील प्रतिक्रिया :-

पुण्यात पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला तीन प्रमुख गोष्टी जबाबदार आहेत. त्यासंदर्भात आपण किमान आता तरी ठोस पावले उचलायला हवीत.

1. नाल्यात टाकला जाणारा कचरा
शहरातील प्रत्येक नागरिकाने कचरा टाकताना काळजी घेतली पाहिजे. अगदी तो कापडाचा तुकडा असो किंवा प्लास्टिकचा. तो रस्त्यावर फेकणं, हे पुराला निमंत्रण देणारं आहे. प्रत्येकाने शिस्तीचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. 

2. नाले आणि नदी काठावर झालेले अतिक्रमण 
अतिक्रमणाचा विषय हा प्रशासनाचा आहे. जे लोक अशा अतिक्रमणाला नियमीत करून देता तेच याला दोषी आहेत. जो कोणी अशा प्रकाराचे अतिक्रमण करेल, त्याला मोठा दंड करून तातडीने ते अतिक्रमण हटविले पाहिजे. 

3. रस्त्यांचे काँक्रिटीकरण 
मुसळधार पावासची चर्चा करताना आपण हे लक्षात घ्यायला हवे की, पुण्यातील बहुतांश जमीन ही रस्त्यांनी व्यापली आहे. आपण, काँक्रिटचे रोड तयार करत आहोत. आपण त्याचा पुनर्विचार करायला हवा. या रस्त्यांमुळे शहराचा श्वास कोंडला आहे. ही महापालिकेची जबाबदारी आहे.
- उर्मिला वैशंपायन, आर्किटेक्ट 

मुख्यमंत्री महोदय आणि तुमचे सिंहगडरोडवरील अज्ञानी लोकप्रतिनिधी, आपल्या नियोजनशून्य कारभारामुळे आतापर्यंत पुण्याच्या पूरपरस्थितीत 55 बळी गेले. अजून किती बळी घेणार आपण? स्मार्ट सिटीतील हा विकास आता बस झाला. जगू द्या पुणेकरांना.
- रुपाली चाकणकर  

काँक्रिटचे रस्ते काढून टाकायला हवेत आणि त्याजागी डांबरी रस्तेच हवेत. काँक्रिटच्या रस्त्यांमुळेच ही परिस्थिती उद्धवली आहे. पुणे महापालिका या सगळ्याला जबाबदार आहे. महापालिकेत नगरसेवक फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी निवडून येत आहेत. त्यांना फक्त त्यासाठीच मतं हवी आहेत.
- पराग गोरे

टिळक रस्त्यावर pmpl च्या बसवर झाड पडून चालकाचा मदतीअभावी मृत्यू झाला, हे पुण्यासारख्या स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या पुण्याला लाजिरवाणी गोष्ट आहे, पण पुणे महानगपालिकेला त्याचं काहीएक सोयरसुतक नाही. स्मार्ट सिटी सारख्या पुण्यात पाण्याचा निचरा करणारी ड्रेनेज व्यवस्था आहे की नाही अशी परिस्थिती आहे. नालेसफाई वेळेवर होत नाही, आपत्कालीन व्यवस्था झोपलेली दिसत आहे. 

जर या आपत्कालीन व्यवस्था सतत अलर्ट असती, तर आज टिळक रोडवर एक निष्पाप बस चाललाकाचा मृत्यू झाला नसता, अनेक रस्तावरच्या झाडांच्या फांद्या तोडल्या जात नाहीत, पुणे महानगरपालिकेतील वृक्ष विभागाचे तीन तेरा वाजले की काय अशी अवस्था आहे, या लोकांना कोण जाब विचारणार आहे की नाही?  
- बिभीषण शेवडे 

पुणे महापालिका काहीही उपाययोजना करीत नाही ह्याचेच आश्चर्य वाटते. फक्त निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. कारण मानवी चुका बऱ्याच आहेत. महापालिका वर्षी गटारे साफ करीत नाही. अनधिकृत बांधकामांना अभय दिलं जातं. स्मार्ट सिटी नुसते बोलून होणार नाही, तर कामे पण स्मार्ट व्हायला पाहिजेत. थोडक्यात काय तर पुणे महापालिकेने जागे होऊन कामाला लागायला पाहिजे.  
- उल्हास कुलकर्णी 

वाढत्या अतिक्रमणामुळे नाले बंद झालेत, त्यामुळे जास्तीचे पावसाचे पाणी जाण्यास जागा नाही. नदीकाठी घरे आहेत, टेकड्यांवर घरे बांधली आहेत. ह्या सर्व बाबींना महापालिकाच जबाबदार आहे. ह्या लोकांना परवानगी देत कोण? सर्व अनधिकृत बांधकामांची त्वरित विलेव्हांट लावली पाहिजे. पुण्यात आता वाहन कोंडी होऊ नये, म्हणून वाहन खरेदीवर नियंत्रणाची गरज आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारायला हवा. हा पाऊस जर आपण दुर्लक्षित केला, तर पुढच्यावर्षी ह्याहून भयंकर स्थिती निर्माण होईल. अजून किती जणांना प्राण गमवावे लागतील माहीत नाही. कदाचित आपल्या घरातलं ही  कोणी असू  शकेल.
- प्रज्ञा चव्हाण

ट्विटरवरील प्रतिक्रिया :-

हा फक्त आणि फक्त महापालिकेचा दोष आहे? मी अनेकदा पुणेकरांना नद्यांच्या पुलावर गाडी थांबवून नदीत कचरा फेकताना पाहिले आहे. मला वाटते ही महापालिका आणि नागरिक दोघांचीही तेवढीच जबाबदारी आहे.
Saket Chaudhari‏@chdri

सध्या पुण्यात वाहन चालवणं खूपच कठीण बनलं आहे. वाहतूक पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन दिसत नाही. अनावश्यक मेट्रोच्या कामाने या परिस्थितीत भर घातली आहे.
Mansi Malu@Mansi11Malu

पुण्यात 1-2 तास पाऊस पडतो आणि संपूर्ण रस्ता पाण्यात जातो. ही परिस्थिती पुन्हा न उद्भवण्यासाठी पालिका काय खबरदारी घेणार आहे, हे सामान्य नागरिकांना समजणं गरजेचं आहे.
Puneri Speaks@PuneriSpeaks 

पुण्यातील प्रत्येकाने आपली जबाबदारी नीट समजून घ्यावी आणि त्या जबाबदारीचे पालन करावे. नियम पाळावेत. हाच सर्वोत्तम पर्याय असेल.
Common Man‏@kishor_munot

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : आम्हाला विरोधीपक्षाची सत्ता द्या, आमची भूमिका स्पष्ट : राज ठाकरे

- Vidhan Sabha 2019 : वसंतदादांचं सरकार घालवण्याइतकं हे सरकार घालवणं सोपं नाही : उद्धव ठाकरे

- Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री म्हणाले, 'शरद पवारांची अवस्था शोलेमधल्या जेलरसारखी!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens Reacts on Social Media on Pune Heavy Rain Issue