नव्या दुचाकींनाच नवी ब्रेक प्रणाली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टिमच्या सक्तीमधून जुन्या दुचाकींना वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एक एप्रिलपासून उत्पादित झालेल्या दुचाकींनाच ही सक्ती लागू असेल, असेही आता स्पष्ट झाले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही या बदलाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना दिलासा मिळणार असून, नव्या भुर्दंडापासून त्यांची सुटका झाली आहे. 

दुचाकींना अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टिम बसविण्याचा आदेश केंद्र सरकारने 2 एप्रिल रोजी जारी केला. सुरवातीला जुन्या दुचाकींना ही ब्रेक प्रणाली बसविण्यासाठी एक एप्रिल 2019 पर्यंतची मुदत दिली होती. परंतु, जुन्या दुचाकींमध्ये ही प्रणाली बसविणार कोण, त्याची देखरेख कशी होणार, या ब्रेक प्रणालीचे प्रमाणीकरण कसे होणार, त्यासाठी नागरिकांना किती खर्च येणार आदी अनेक प्रश्‍न उद्‌भवले होते. त्यामुळे दुचाकीचालक आणि विविध कंपन्यांच्या वितरकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयानेही केंद्र सरकारबरोबर पत्रव्यवहार केला होता. 

या पार्श्‍वभूमीवर केंद्राने स्पष्टीकरण केले आहे. त्यानुसार अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टिम ही 1 एप्रिल 2018 नंतर उत्पादित होणाऱ्या नव्या दुचाकी वाहनांनाच लागू असेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

नव्या ब्रेक प्रणालीमुळे दुचाकी घसरणार नाही. दोन्ही चाकांना एकदम ब्रेक लागणार आहे. त्यामुळे दुचाकींचे अपघात मोठ्या संख्येने कमी होतील, असा केंद्र सरकारचा होरा आहे. दरम्यान, अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टिम प्रणाली बसवून देण्याच्या नावाखाली काही गॅरेज व्यावसायिक नागरिकांची लूट करीत आहेत. जुन्या दुचाकींना ही प्रणाली बसविणे शक्‍य नाही, हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन वितरकांनी केले आहे. 

Web Title: New Brake System to new bike