Pune News : विद्यार्थ्यांकडील हत्यारे, नशिल्या पदार्थांचे नवे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 new challenge of weapons drugs from students Need for Awareness police crime

Pune News : विद्यार्थ्यांकडील हत्यारे, नशिल्या पदार्थांचे नवे आव्हान

हडपसर : शहर व उपनगरांमध्ये कोयता गँगच्या दहशतीच्या घटना घडत असतानाच दुसरीकडे शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडेही कोयत्यासारखी हत्यारे आणि नशा आणणारे साहित्य सापडू लागले आहे. त्यामुळे शाळा, पालक व पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीवर वेळीच अंकुश आणण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

सध्या पोलिस प्रशासनाकडून शहर व उपनगरांतील शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘पोलिस काका’ व ‘दीदी’ नावाचा चांगला उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, निकोप वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी उपाययोजना करणे आदी गोष्टींबाबत या उपक्रमातून विद्यार्थी व शिक्षकांना माहिती देऊन प्रबोधन केले जात आहे.

त्याचा चांगला परिणामही जाणवून येत आहे. मात्र, याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालयांत जात असलेल्या पोलिसांना काही विद्यार्थ्यांकडे कोयते, चाकू अशा हत्यारांसह गांजा, बंटा, तपकीर, गुटखा, तंबाखूसारख्या नशा आणणाऱ्या वस्तूही आढळून आलेल्या आहेत.

या विद्यार्थ्यांची संवाद साधताना काही विद्यार्थी ‘स्वॉरी’ म्हणतात, काही एकमेकांवर ढकलून देतात, माझा याच्याशी संबंध नसल्याचे खोटे सांगतात, काही स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगत असल्याचे सांगतात. सध्या अनेक शाळा महाविद्यालयांतून अशी प्रकरणे वारंवार पुढे येऊ लागली आहेत.

ही आहेत कारणे...

 • मोबाईलचा अतिरेकी वापर

 • दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रभाव

 • नावीन्याचे आकर्षण

 • कमी झालेला कौटुंबिक संवाद

 • पालक व शिक्षकांचे दुर्लक्ष

 • मित्र-मैत्रिणीचे संगतगुण

गुन्हेगारीचे प्रकार

 • मुलींची छेडछाड, रॅगिंग

 • हत्यारे बाळगून दहशत पसरविणे

 • नशिले पदार्थ बाळगून त्याचे सेवन करणे

 • मोबाईलवरून अश्लील चॅटिंग करणे

 • पालकांची फसवणूक करून पैसे उकळणे

या आहेत उपाययोजना

 • पालकांनी पाल्याशी सुसंवाद करणे

 • पाल्‍याच्या मित्र-मैत्रिणींची माहिती ठेवणे

 • भरकटणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे

 • शाळा महाविद्यालयांतील वातावरण सुरक्षित ठेवणे

 • पोलिस कारवाई वाढविणे

शहर पोलिसांच्या भरोसा सेलच्या माध्यमातून ‘दामिनी’ पथक काम करीत आहे. विद्यार्थ्यांना निर्भयपणे शिक्षण घेता यावे, या दृष्टीने थेट शाळांमध्ये जाऊन समुपदेशन करतो. गुड टच-बॅड टच, घरातून मिळणारी वागणूक, शाळा प्रवासात काही त्रास, बाहेरील व्यक्तींकडून गैरवर्तन याबाबत माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे काम यातून होते.

- वैशाली उदमले, भरोसा सेल, दामिनी पथक, गुन्हेशाखा

हडपसर परिसरातील सुमारे पन्नास शाळा-महाविद्यालयांना ‘पोलिस काका’ उपक्रमांतर्गत भेटी दिलेल्या आहेत. त्यादरम्यान काही विद्यार्थ्यांकडे नशा आणणारे पदार्थ व हत्यारे असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांच्या चांगल्या जडणघडणीच्या दृष्टीने उपाययोजना राबवीत आहोत.

- दिनेश शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे

शहरातील बत्तीसही पोलिस ठाण्यांतून ‘भरोसा सेल’चे काम चालते. २१ पोलिस ठाण्यांत बालस्नेही पोलिस कक्ष सुरू केली आहेत. त्याठिकाणी बालगुन्हेगार व पालकांचे समुपदेशन केले जाते. ‘होप फॉर द चिल्ड्रेन’ व ‘पंख’ या सामाजिक संस्थांची त्यासाठी मदत घेतली जाते.

- अर्चना कटके, सहायक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल

हडपसर पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या शाळा महाविद्यालयांत ‘पोलिस काका व दीदी’ उपक्रम सुरू आहे. त्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून प्रबोधन केले जात आहे. संस्काराचा अभाव व नावीन्याच्या आकर्षणातून विद्यार्थ्यांमध्ये बदल जाणवत आहे.

- अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे

टॅग्स :Pune Newscrimestudent