न्यू इंग्लिश स्कूलची दारे मुलींसाठी खुली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - लोकमान्य टिळक यांनी 1880 मध्ये सुरू केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज तब्बल 81 वर्षांनंतर पुन्हा विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. या मुलींचा शाळेच्या पहिल्या दिवसाचा पहिला तास महापौर मुक्ता टिळक यांनी घेतला.

पुणे - लोकमान्य टिळक यांनी 1880 मध्ये सुरू केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज तब्बल 81 वर्षांनंतर पुन्हा विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. या मुलींचा शाळेच्या पहिल्या दिवसाचा पहिला तास महापौर मुक्ता टिळक यांनी घेतला.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1936 पर्यंत विद्यार्थिनींना प्रवेश दिल्याच्या नोंदी आढळतात. त्यानंतर 81 वर्षे शाळेत फक्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. यंदापासून विद्यार्थिनींनाही प्रवेश देण्याचा निर्णय डेक्कन एज्युकेशन सोसायटीने घेतला. यावर्षी इयत्ता पाचवी आणि नववीमध्ये काही विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थिंनींचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक सुनील भंडगे, मुख्याध्यापक नागेश मोने उपस्थित होते.

मुला-मुलींमध्ये लहानपणापासूनच एकमेंकाविषयी सन्मानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थिंनींना शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- नागेश मोने, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड)

माझा जुळा भाऊ शार्दुल याच शाळेत नववीत शिकत आहे. आज मला त्याच्याच वर्गात एकत्र शिक्षण घेण्याची संधी मिळाली. यापूर्वी मी रेणुका स्वरूप शाळेत होते. नव्या मैत्रिणी भेटल्याचा आनंदही आहे.
- स्वराली पंडित, विद्यार्थिनी

मी यापूर्वी महापालिकेच्या विद्यानिकेतन (शाळा क्रमांक 8) मध्ये शिक्षण घेत होते. शाळेत पहिल्यांदा पाऊल ठेवल्यावर मुलांची संख्या पाहून जराशी भीती वाटली होती; परंतु शाळा भरल्यावर मात्र छान वाटत आहे.''
- नर्गिस शेख, विद्यार्थिनी

न्यू इंग्लिश स्कूलचा मी माजी विद्यार्थी आहे. मुलीने माझ्याच शाळेत शिक्षण घ्यावे, असे वाटत होते; परंतु केवळ मुलांची शाळा असल्यामुळे तिचा प्रवेश शाळेत घेता आला नाही. यंदा ती पाचवीत असून, शाळेमध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्याची संधी उपलब्ध झाल्याने लगेचच तिचा प्रवेश घेतला.
- मंगेश कुडली, पालक

Web Title: new english school girl education