नव्या घरांना 15 टक्के करवाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - महापालिका प्रशासनाने निवासी मिळकतींच्या वाजवी भाड्याचा दर आता किमान दोन रुपये पाच पैसे, तर कमाल तीन रुपये पाच पैसे केला आहे. तर, बिगरनिवासी मिळकतींच्या वाजवी भाड्याचा दर किमान पाच रुपये 70 पैसे, तर कमाल 10 रुपये 50 पैशांपर्यंत वाढविला आहे. या दरवाढीमुळे नव्या घरांच्या मिळकतकरात 15 टक्‍क्‍यांनी वाढ होणार असून, याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसणार आहे. 

पुणे - महापालिका प्रशासनाने निवासी मिळकतींच्या वाजवी भाड्याचा दर आता किमान दोन रुपये पाच पैसे, तर कमाल तीन रुपये पाच पैसे केला आहे. तर, बिगरनिवासी मिळकतींच्या वाजवी भाड्याचा दर किमान पाच रुपये 70 पैसे, तर कमाल 10 रुपये 50 पैशांपर्यंत वाढविला आहे. या दरवाढीमुळे नव्या घरांच्या मिळकतकरात 15 टक्‍क्‍यांनी वाढ होणार असून, याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसणार आहे. 

महापालिका प्रशासनाने मिळकतकराची आकारणी करावयाच्या वाजवी भाड्याच्या दरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. सध्या निवासी मिळकतींच्या वाजवी भाड्याचे दर रेडीरेकनरमधील विविध झोननुसार ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये कमीत कमी एक रुपया 80 पैसे, तर जास्तीत जास्त दोन रुपये 80 पैसे दर होता. यात 1 एप्रिलपासून 25 पैशांनी वाढ केली आहे. बिगरनिवासी मिळकतींसाठी वाजवी भाड्याचा दर किमान पाच रुपये 20 पैसे, तर कमाल 10 रुपये होता. यामध्ये आता 50 पैशांनी वाढ झाली आहे. 

एक एप्रिलनंतर ज्या मिळकतींची नव्याने करआकारणी करण्यात येणार आहे, ती वाढीव दराने होईल. त्यामुळे नवी सदनिका खरेदी केली आहे; परंतु करआकारणी झाली नाही, त्यांची आता नव्या दराने मिळकतकराची आकारणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कराचा बोजा पडणार आहे. मात्र मिळकतकर यापूर्वीच लागू झाला आहे, त्यांना वाढीव दराचा फटका बसणार नाही. 

आता किती कर भरावा लागणार  
उदाहरणार्थ बावधनमध्ये पाचशे चौरस फुटांची सदनिका आहे. 1 एप्रिलपूर्वी त्या भागात वाजवी भाड्याचा दर 1 रुपया 80 पैसे होता. तो आता 2 रुपये 5 पैसे झाला आहे. वाजवी भाड्याचा दर (2.05) गुणिले 12 महिने गुणिले 500 चौरस फूट केल्यानंतर 12 हजार 300 रुपये वार्षिक करपात्र रक्कम येणार आहे. ती सदनिका स्वत: मालक वापरत असेल, तर चाळीस टक्के सवलत मिळते. त्यानुसार 12 हजार 300 रुपयांतून चाळीस टक्‍क्‍यांची सवलत (4 हजार 920 रुपये) वजा केल्यास 7 हजार 380 रुपये रक्कम येते. त्या रकमेवर सदनिका मालकास 15 टक्के देखभाल दुरुस्तीसाठीची सवलत (1 हजार 107 रुपये) मिळाल्यानंतर 6 हजार 273 रुपये रक्‍कम येते. ही रक्कम वार्षिक करपात्र रक्कम ग्राह्य धरली जाते. त्यावर 50.75 टक्के कर आकारला जातो. त्यामुळे त्या सदनिकाधारकाला 3 हजार 183 रुपये वर्षाला मिळकतकर भरावा लागणार आहे. 1 एप्रिलपूर्वी म्हणजे 1 रुपया 80 पैसे या वाजवी भाड्याच्या दराने त्या सदनिकेची मिळकतकर आकारणी झाली असती, तर 2 हजार 807 रुपये कर आला असता. वाजवी भाड्याच्या दरवाढीमुळे या सदनिकेचा 376 रुपये अधिकचा कर भरावा लागणार आहे. 

एकीकडे पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना करमाफी देण्याचा विचार सुरू असताना, दुसरीकडे वाजवी भाड्याच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांवर करवाढीचा बोजा टाकला जात आहे. त्यामुळे महापालिकेने वाजवी भाड्याच्या दरात केलेली वाढ चुकीची असून, ती मागे घ्यावी. या वाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. 
- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क संस्था 

Web Title: New homes increase 15 percent tax