नवीन साहित्य प्रकाशित करण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे - राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची नुकतीच निवड झाली आहे. मंडळावरील अध्यक्ष आणि सदस्यांची नव्याने नियुक्ती केल्यानंतर त्यांची पहिली बैठक नुकतीच झाली. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. मोरे यांच्याशी साधलेला हा संवाद.

पुणे - राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची नुकतीच निवड झाली आहे. मंडळावरील अध्यक्ष आणि सदस्यांची नव्याने नियुक्ती केल्यानंतर त्यांची पहिली बैठक नुकतीच झाली. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. मोरे यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्‍न - आगामी काळात मंडळातर्फे कोणते उपक्रम हाती घेण्यात येतील?
उत्तर - मंडळामार्फत या वर्षी नवीन साहित्य प्रकाशित करण्यात येणार आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांची यंदा जन्मशताब्दी आहे. हे औचित्य साधून त्यांचे आत्मचरित्र मंडळातर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरच त्यांचे निवड साहित्यही प्रकाशित करण्याचा मंडळाचा विचार आहे.

साहित्य व संस्कृती मंडळाच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली?
- मंडळाच्या कामकाजासंदर्भात नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक नुकतीच झाली. यामध्ये मागील कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. मंडळ स्थापनेच्या वेळी ठरविण्यात आलेल्या ध्येय, धोरणे आणि उद्दिष्टांनुसार मंडळाची पुढील वाटचाल होणार आहे. मंडळाच्या कामकाजासाठी ठरवून दिलेल्या नियमाची चौकट समजून घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मंडळाचे ध्येय साध्य करण्यासाठी काय पावले उचलली जातील?
- मराठी साहित्य, संस्कृती आणि महाराष्ट्राचा इतिहास यासंदर्भात संशोधन आणि प्रकाशन हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे मराठी भाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे. त्यासाठी इतर भाषांमधील दर्जेदार पुस्तके मराठीत अनुवादित करण्याचा काम मंडळातर्फे केले जाते. त्याप्रमाणे अधिकाधिक पुस्तके अनुवादित व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील. राज्य सरकारतर्फे दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंडळाला दिला जातो. राज्य मराठी विकास संस्था, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळ अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील. मंडळाने आतापर्यंत जवळपास साडेपाचशे पुस्तके प्रकाशित केली आहेत. वाचकांच्या मागणीनुसार त्यातील बऱ्याच पुस्तकांचे पुनर्प्रकाशनही करण्यात आले आहे. राज्याचे भविष्य घडविण्यातही मंडळाचा महत्त्वाचा वाटा असावा, असे अपेक्षित असून, त्याचे निश्‍चितच दडपण असून अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Web Title: New literature published Sadanand More