पायरसी वेबसाइट नव्या चित्रपटांसाठी डोकेदुखी

piracy-website
piracy-website

पुणे - मराठी, हिंदी किंवा कोणत्याही भाषेत नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच तो ऑनलाइन पायरसी होऊन विविध वेबसाइटवर झळकतो आणि क्षणार्धात त्या त्या चित्रपटाचे ‘बजेट’ अक्षरशः कोसळते. केवळ चित्रपटच नाही; तर पुस्तके, ई-बुक्‍स, संगीत, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, गेम्स अशा मनोरंजनाच्या घटकांना पायरसी वेबसाइटचा फटका बसत आहे. कोणाचाच धाक नसल्याने पायरसी वेबसाइटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याची सर्वाधिक आर्थिक झळ भारतीय चित्रपट क्षेत्राला बसत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी चिंता व्यक्‍त केली.

‘बिग बजेट’, ‘बिग स्टार’ चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतो किंवा एखादा ‘म्युझिक अल्बम’ गाजतो. ठरावीक गेम्स लोकप्रिय होतात; अशा वेळी चित्रपट, संगीत, गेम्स लोकांपर्यंत पोचवून त्यातून पैसे कमविण्यासाठी सीडी, डीव्हीडीचा उपयोग होत असे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सीडी, डीव्हीडी, पेनड्राइव्ह मागे पडले आहेत. त्यांची जागा पायरसी वेबसाइटने घेतली असून, त्याद्वारे नवे चित्रपट, ई-बुक्‍स, संगीत किंवा या स्वरूपातील मनोरंजनाची अन्य साधने काही क्षणातच मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर येऊन धडकू लागली आहेत. युरोप, नेदरलॅंड, अमेरिका व आशिया खंडामध्ये अशा पायरसी वेबसाइटचा सुळसुळाट झाला आहे. पायरसी वेबसाइटचा सर्वाधिक फटका भारतीय चित्रपट उद्योगास बसू लागल्याची चिन्हे आहेत.

त्यापैकी काही मोठ्या कंपन्यांनी पायरसी वेबसाइटचा धोका टाळण्यासाठी काळजी घेतली आहे. परंतु, प्रत्यक्षात बहुतांश चित्रपटनिर्मात्यांना पायरसी वेबसाइटचा फटका बसू लागला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर काही वेळातच पायरसी वेबाइटवर तो चित्रपट दिसतो. त्यामुळे बहुतांश प्रेक्षकांच्या उड्या अशा पायरसी वेबसाइटवर पडतात. परिणामी, संबंधित चित्रपटाला फटका बसतो, असे काही निर्मात्यांनी सांगितले. केवळ पुणे, महाराष्ट्रच नव्हे; तर देशाच्या वेगवेगळ्या भागांतील निर्मात्यांना हा फटका सहन करावा लागत आहे.

चित्रपटच नव्हे, तर पुस्तके, ई-बुक्‍सचीही ऑनलाइन पायरसी होते. त्यामुळे लेखकाचेच सर्वाधिक नुकसान होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी बाहेरील सॉफ्टवेअरवर अवलंबून न राहता कंपन्यांनी स्वतःच ‘डिजिटल राइट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर’ तयार करण्याची गरज आहे.
- मंदार जोगळेकर, संस्थापक, बुकगंगा डॉट कॉम

पायरसी वेबसाइटद्वारे कॉपीराइट कायद्याचा भंग झाल्याचा शहरात एकही गुन्हा दाखल नाही. अशा गुन्ह्याची नोंद झाल्यास आम्ही त्याबाबत तत्काळ ‘सेंट्रल कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ला माहिती देतो. त्यानंतर पुढील तपास प्रक्रिया त्यांच्याद्वारे केली जाते.
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

चित्रपटगृह, लॅब किंवा अन्य माध्यमातून नवे चित्रपट ऑनलाइन पायरसी वेबसाइटवर येतात. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रश्‍नावर ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे दक्षिण भारतातील निर्मात्यांसह देशभरातील चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणून पायरसी वेबसाइट बंद करण्यासाठी प्रयत्न करू.
- टी. पी. अगरवाल, अध्यक्ष, इंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन (इम्पा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com