वांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल

विठ्ठल तांबे
सोमवार, 21 जानेवारी 2019

धायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी व अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. 

धायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी व अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. 

धायरी फाटा येथे होणारी कोंडी फोडण्यासाठी स्व. रमेशभाऊ वांजळे उड्डाण पुलाला जोडून नवीन वाय आकाराचा पूल तयार केला जाणार आहे. धायरी, नऱ्हे या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना वांजळे पुलाचा उपयोग होत नव्हता. तसेच, उड्डाण पुलाखालील सर्व्हिस रस्त्यावरून धायरी गावाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढून तेथे वारंवार कोंडी होत होती. पादचाऱ्यांनाही याचा त्रास होता. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून वांजळे पुलाला जोडून तयार होणाऱ्या नव्या पुलाचा एक रस्ता नांदेड सिटीकडे, तर दुसरा रस्ता धायरी गावाकडे जाणारा आहे. यासंदर्भात नगरसेविका राजश्री नवले, नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका नीता दांगट यांनी पाठपुरावा केला होता. या प्रकल्पास पुणे पालिकेच्या शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेने मंजुरी दिली आहे.

या पुलामुळे वाहतूक कोंडी व्यवस्थापन होण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे वेळेची बचत होईल. डीएसके विश्व, धायरी गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना कोंडीपासून सुटका मिळेल.
- रामदास शिंदे, नागरिक

नवीन पुलामुळे धायरीचा वाहतुकीचा प्रश्न सुटेल, हा विषय मुख्य सभेकडे मान्यतेसाठी जाईल. त्यानंतर पुढील नवीन आर्थिक वर्षात प्रत्यक्षात कामास सुरवात होईल.
- राजश्री नवले, नगरसेविका

या पुलाला मुख्य सभेने मान्यता दिल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील आर्थिक वर्षात प्रत्यक्षात कारवाई करणार आहे.
- श्रीनिवास बोनाला, प्रकल्प विभाग- मुख्य अभियंता

Web Title: New Overbridge for Dhayari