नवा पक्ष, नवा विचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - आपापल्या पक्षातूनच पत्ते अर्थात, तिकिटे कापण्याचे राजकारण होताच, इच्छुकांनी ऐनवेळी अन्य राजकीय पक्षांमध्ये उड्या घेतल्या. परंतु, प्रभागरचना जाहीर झाल्यापासून म्हणजेच गेल्या चार-सहा महिन्यांपासून राबविलेल्या प्रचारयंत्रणेत बदल करून त्यांना आता ‘नवा पक्ष, नवा विचार आणि नवी यंत्रणा’ घेऊन मते मागावी लागणार आहेत. जेमतेम दोन-चार दिवसांत ही यंत्रणा उभारताना ऐन प्रचारात उमेदवारांची तारांबळ उडणार असल्याचे दिसून येत आहे.

पुणे - आपापल्या पक्षातूनच पत्ते अर्थात, तिकिटे कापण्याचे राजकारण होताच, इच्छुकांनी ऐनवेळी अन्य राजकीय पक्षांमध्ये उड्या घेतल्या. परंतु, प्रभागरचना जाहीर झाल्यापासून म्हणजेच गेल्या चार-सहा महिन्यांपासून राबविलेल्या प्रचारयंत्रणेत बदल करून त्यांना आता ‘नवा पक्ष, नवा विचार आणि नवी यंत्रणा’ घेऊन मते मागावी लागणार आहेत. जेमतेम दोन-चार दिवसांत ही यंत्रणा उभारताना ऐन प्रचारात उमेदवारांची तारांबळ उडणार असल्याचे दिसून येत आहे.

प्रभागातील विकासकामांचे चित्र मांडणारा अहवाल, घरोघरी वाटली जाणारी पत्रके, भित्तिपत्रके, बॅनर, स्टिकर्स, झेंड्यांपासून प्रचार कचेऱ्यांमध्ये बदल करून नव्या पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार यंत्रणेची रचना करण्यासाठी आयाराम-गयारामांचे कार्यकर्ते धडपड करीत आहेत. मतदानासाठी पंधरा दिवसांचा अवधी राहिल्याने आपल्या नव्या पक्षाचा विचार मतदारांपर्यंतचे पोचवावे लागणार आहे. साहजिकच, पक्षांतर केलेल्या उमेदवारांना पुन्हा त्याच यंत्रणेवर खर्च करावा लागत असून, त्यामुळे पैसा, वेळ आणि श्रम वाया जात असल्याची भावना या उमेदवारांचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. 
नवी प्रभागरचना आणि त्यातील आरक्षणे जाहीर झाल्यानंतर लगेचच राजकीय पक्षांमधील विद्यमान नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षात निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यानुसार प्रभागांमध्ये भलीमोठी यंत्रणाही कामाला लावली होती. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही पक्षांमधील विद्यमानांची तिकिटे कापण्यात आली. पक्षाने गाफील ठेवल्याची भावना व्यक्त करीत इच्छुकांनी पक्षांतर केले. उमेदवारी नाकारूनही न डगमगता पक्षाला आव्हान देत, काही विद्यमानांनी ऐनवेळी अन्य पक्षांकडून ‘एबी’ फॉर्म मिळविले. 

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास ४० इच्छुकांनी पक्षांतर केल्याने त्यांना आपल्या प्रभागातील सर्व प्रचारयंत्रणाच बदलावी लागली असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने प्रचाराच्या नियोजनासह कार्यकर्त्यांची उठबस व्हावी, याकरिता थाटलेल्या कचेऱ्यांमध्ये बदल करावे लागले आहेत. कमीत-कमी वेळेत यंत्रणा बदलताना उमेदवारांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. 

व्यावसायिक शेखर देडगावकर म्हणाले, ‘‘इच्छुकांकडून गेल्या दोन महिन्यांपासून छपाईची कामे येत आहे. परंतु, काही जणांनी आता पक्ष बदलल्याने त्यांची कामे बदलली आहेत. त्या-त्या पक्षांच्या फलकांची कामे आली आहेत. काही जणांनी तर अपक्ष असल्याने त्यानुसार कामे करून घेतली आहेत.’’

राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी सहा महिन्यांपासून तयारी केली होती. परंतु, कल्पना न देता तिकीट नाकारले. त्यामुळे शिवसेनेतून लढणार आहे.  त्यामुळे प्रचारयंत्रणेत मोठे बदल केले आहेत. काही कामे सुरू आहेत.
- शिवलाल भोसले, नगरसेवक

असे केले बदल...
 प्रचार कचेऱ्यांवर लावले नवीन पक्षाचे चिन्ह, नेत्यांचे छायाचित्र 
 प्रचारफेऱ्यांसाठी केली वाहनरचना विशेषत: प्रचाररथ
  प्रभागातील नवी विकासकामे व केलेल्या कामांची माहिती मांडणारा अहवाल
  जाहीरनामा, वचननाम्यासाठी तयारी 
  सोशल मीडियावर विशेषत: व्हॉट्‌सप, फेसबुकवरील चित्रीकरण, मजकूर 
  फलक, स्टिकर्स आणि झेंड्यांचा वापर

Web Title: new party, new thinking