चक्राकार वाहतुकीला हवी नवीन सिग्नल यंत्रणेची जोड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पिंपरी- हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी नवीन सिग्नल व्यवस्था बसविण्याबाबत वाहतूक पोलिसांनी एमआयडीसी आणि महापालिकेकडे दोन महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आजतागायत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने येथील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत चालल्याचे वास्तव समोर आले आहे. 

पिंपरी- हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी नवीन सिग्नल व्यवस्था बसविण्याबाबत वाहतूक पोलिसांनी एमआयडीसी आणि महापालिकेकडे दोन महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आजतागायत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने येथील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत चालल्याचे वास्तव समोर आले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

आयटी पार्कमधील शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेला चक्राकार वाहतुकीचा प्रयोग आता कायमस्वरूपी राबविण्यात येणार असला तरी या मार्गावरील दुभाजक या प्रयोगासाठी डोकेदुखी ठरत आहेत. या मार्गावर एकूण 14 दुभाजक असून, त्यापैकी सहा चक्राकार मार्गावर आहेत. आयटी पार्कच्या फेज दोनमध्ये सात आणि मेगा नाइन परिसरात एक दुभाजक आहे. हे सर्व दुभाजक बंद केल्यानंतरच येथील वाहतुकीमध्ये सुरळीतपणा येणार आहे. 

तीन चौकासंदर्भात एमआयडीसीला पत्र 
विप्रो सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीमध्ये सातत्याने भर पडताना दिसत आहे. प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. जॉमेट्रिक सर्कल आणि जांभूळकर चौकामध्येही ही समस्या वाढताना दिसत आहे. या परिसरात कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी विप्रो सर्कल, जॉमेट्रिक सर्कल आणि जांभूळकर चौक परिसरात नवीन सिग्नल यंत्रणा बसवण्यासंदर्भात एमआयडीसीला ऑक्‍टोबर महिन्यात पत्राद्वारे कळविले होते. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय न झाल्यामुळे येथील कोंडी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 

महापालिकेशीही पत्रव्यवहार 
आयटी पार्ककडे येणाऱ्या रस्त्यावर पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत तिथे वाहनांना अडकून पडावे लागत आहे. हे लक्षात घेऊन काळा खडक चौक, सयाजी भुयारी मार्ग, मारुंजी वाय जंक्‍शन, इंडियन ऑइल चौक आणि सूर्या भुयारी मार्ग या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केला आहे. मात्र, येथे ही यंत्रणा सुरू करण्यास अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे येथील वाहतूक समस्याही कायम आहे. 

दुभाजकांतील जागांचा अडथळा 
विप्रो सर्कलकडून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर तीन ठिकाणी वाहनांना वळण्यासाठी दुभाजकांमध्ये जागा ठेवण्यात आली आहे. साहजिकच वळण्यासाठी वाहने येथे थांबतात, त्यामुळे अनेकदा वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. त्यातच आयटी पार्ककडे जाणारी वाहने वेगात असल्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. शिवाय वळणाऱ्या वाहनांमुळे विप्रो सर्कलकडून येणाऱ्या वाहनांना त्या ठिकाणी थांबून राहावे लागते. दरम्यान, विप्रो सर्कलच्या परिसरात रस्त्यालगत लावण्यात येणाऱ्या दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. 

""चक्राकार वाहतुकीमुळे शिवाजी चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली असली तरी विप्रो सर्कल, जॉमेट्रिक सर्कल या भागातील कोंडी वाढू लागली आहे. एमआयडीसी प्रशासनाने यामध्ये तत्काळ लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पोलिसांवरील ताण कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.'' 
-केदार तुंगीकर, संगणक अभियंता, हिंजवडी. 

""वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण झाल्यास वाहतूक सुधारण्यास त्याची मदत होणार आहे.'' 
-किशोर म्हसवडे, पोलिस निरीक्षक (वाहतूक), हिंजवडी विभाग. 

Web Title: new signaling system is required for circular traffic for Hinjewadi IT Park Traffic