नवीन गाडी हवी, पण हेल्मेट नको

Helmet-Bike
Helmet-Bike

पुणे - नवीन दुचाकी खरेदी करताना त्यासोबत हेल्मेट घेण्याच्या नियमाच्या सक्तीला पुणेकरांचा विरोध होत आहे. असे असताना या नियमाच्या कडक अंमलबजावणीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) वाहतूक पोलिसांनी पत्र पाठवले आहे. हेल्मेट न देणाऱ्या शोरूम चालकावर कारवाई करावी, असेही सांगितले आहे.

पुण्यात रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पोलिसांनी हेल्मेटच्या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यांत अपघातांमध्ये ३० दुचाकीस्वारांचा, तर आठ सहप्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 

हेल्मेट सक्तीसाठी दुचाकी शोरूमचालकांनी हेल्मेटशिवाय दुचाकी विकू नये, असे आदेश दिले होते. काही काळ काही शोरूमचालकांनी मोफत हेल्मेट दिले होते; परंतु आता मोफत हेल्मेट देणे बंद केले आहे. ग्राहकही आमच्याकडे घरी हेल्मेट आहे. आम्हाला नवे हेल्मेट नको, असे सांगत आहेत. दुचाकी घेण्यापुरते व पासिंगसाठी दुसऱ्यांचे हेल्मेट वापरले जात आहे. 

वाहतूक पोलिसांनी याबाबत आरटीओला पत्र पाठवून दुचाकी विकताना शोरूमचालकांनी ग्राहकास दोन हेल्मेट देण्याच्या सूचना द्याव्यात. पासिंग करताना खरेच हेल्मेट आहे का, याची खातरजमा करावी. या नियमांची टाळाटाळ करणाऱ्या शोरूमचालकांवर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकांनाही त्यांच्या हद्दीतील शोरूमचालकांना हेल्मेटबाबत लेखी सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. 

आम्ही ‘आरटीओ’ला पत्र पाठवून नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. शोरूमचालक हेल्मेट देतात की नाही, याचे ऑडिट ‘आरटीओ’कडून केले जाते. कायद्याची अंमलबजावणीसाठी प्रयत्न आहे.
- पंकज देशमुख,  पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

दुचाकी खरेदी करताना ग्राहकांना हेल्मेट घेण्याबाबात सांगितले जाते. त्या वेळी आमच्याकडे हेल्मेट आहे, असे ग्राहक सांगतात. काही वेळेला दुसऱ्यांचे हेल्मेट घेऊन येतात. दुचाकी घेताना उत्साहाने नवीन हेल्मेट घेणारे कमी आहेत. आम्ही हेल्मेटसक्ती केल्यास ग्राहक नाराज होतात.
- शोरूम व्यवस्थापक, सिंहगड रस्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com