Vidhan Sabha 2019 : नवमतदार, तरुणाईचा आठही मतदारसंघात उत्साहात सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

तीन दिवसांपासून बरसत असलेला पाऊस उघडल्यामुळे सोमवारी लख्ख सूर्यप्रकाशात शहर आणि उपनगरांत उत्साहाच्या वातावरणात सोमवारी मतदानाला प्रारंभ झाला. त्यामध्ये विशेषतः नवमतदार आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

विधानसभा 2019  
पुणे-  तीन दिवसांपासून बरसत असलेला पाऊस उघडल्यामुळे सोमवारी लख्ख सूर्यप्रकाशात शहर आणि उपनगरांत उत्साहाच्या वातावरणात सोमवारी मतदानाला प्रारंभ झाला. त्यामध्ये विशेषतः नवमतदार आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सुरवातीच्या टप्प्यात शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत धीम्या गतीने मतदानास प्रारंभ झाला. दुपारनंतर मतदानासाठी गर्दी वाढत गेली. मात्र, सायंकाळी चारनंतर अखेरच्या टप्प्यात सर्वच मतदारसंघांतील बूथवर गर्दी झाल्याचे दिसून आले. बॅलेट मशिन काही ठिकाणी बंद पडल्याच्या घटना घडल्या. मात्र, अल्पावधीत त्या सुरू करण्याची तत्परता प्रशासनाने दाखविली. वादाचे तुरळक प्रसंग वगळता शहरातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

शहरात गेल्या तीन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू होता. रविवारीही दिवसभर पाऊस होता. त्यामुळे सोमवारी पाऊस उघडावा, अशी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. वरुणराजाने ती ऐकली आणि सोमवारचा दिवस लख्ख सूर्यप्रकाशाने सुरू झाला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, ही कार्यकर्त्यांची अपेक्षा मात्र फोल ठरली. मतदानसंख्येच्या तुलनेत सकाळी सात ते नऊ या वेळेत कसबा, कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर, हडपसर, कोथरूड, वडगाव शेरी, खडकवासला आणि पर्वतीमध्ये सुमारे दहा टक्‍क्‍यांच्या आसपास मतदान झाले होते. त्यात कोथरूड, शिवाजीनगर, कसबा भागात सेलिब्रिटींनी पहिल्या टप्प्यातच मतदान करून त्याची छायाचित्रे ‘व्हायरल’ केली.

मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी विशेष यंत्रणा लावली होती. परंतु, मतदारांचा निरुत्साह पहिल्या टप्प्यात दिसून आला. मतदान सकाळी सात वाजता सुरू झाले अन्‌ सायंकाळी सहा वाजता थांबले. त्यामुळे उमेदवारांचाही दिवस सकाळी ेसहा वाजल्यापासूनच सुरू झाला होता. त्या त्या भागातील बूथवर कार्यकर्ते आहेत ना, ते मतदारांपर्यंत पोचत आहेत का, यावर त्यांची काटेकोर देखरेख होती.

सकाळी मतदानात ज्येष्ठ नागरिक तसेच फिरायला जाणाऱ्या नागरिकांचा विशेषतः सहभाग होता. सकाळी अकरा वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर गजबज दिसू लागली. मतदान बूथपासून शंभर मीटरच्या आत वाहने आणण्यास पोलिसांनी बंदी केली होती. परंतु, गर्दी वाढत गेल्यावर पोलिसांचा बंदोबस्त कमी पडला. मतदार यादीत नाव सापडत नाही, एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या बूथवर गेल्याच्या तक्रारी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी होत्या. तसेच मतदार केंद्रांवर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या सुविधा त्यांना उपयुक्त ठरल्याचे दिसून आले. काही उमेदवारांनी मतदारांची ने-आण करण्यासाठी रिक्षा ठेवल्याचे दिसून आले. अप्रत्यक्षपणे ही वाहतूक सुरू होती. सायंकाळी पाच वाजल्यानंतर कॅंटोन्मेंट, कसबा, पर्वती, शिवाजीनगर आणि वडगाव शेरीमध्ये मतदारांची संख्या वाढल्याचे दिसून आले. उमेदवारांचे कार्यकर्ते ‘भेटल्या’नंतर मतदानाला जाऊ, अशी वस्ती भागातील मतदारांची अपेक्षा असल्यामुळे मतदानाला उशीर झाला होता.

सोशल मीडियावर नवमतदारांचा उत्साह

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा उत्साह लक्षवेधक होता. कुटुंबासमवेत मतदान झाल्यावर सेल्फी काढून ती फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर शेअर केली गेली. या ग्रुप सेल्फींच्या क्रेझमुळे फेसबुकच्या अनेक वॉल सोमवारी दुथडी वाहत होत्या. तर, नवमतदारही आपल्या सेल्फी सोशल मीडियावर आवर्जून शेअर करीत असल्याचे दिसून आले. 

पहिल्या टप्प्यातील मतदानात...
  सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठांनी, नागरिकांनी गाठले मतदान बूथ 
  मतदानानंतर सेलिब्रिटींनी त्यांची छायाचित्रे केली व्हायरल
  सकाळी सात ते दहा या वेळेत धीम्या गतीने, तर ११ नंतर गर्दी 
  उमेदवारांची ‘वाट’ पाहणाऱ्या मतदारांची सायंकाळी चारनंतर गर्दी 
  मतदार यादीचे ‘ॲप’ मतदारांना ठरले उपयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New voters and youth participated in all eight pune constituencies

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: