'नव्याने वारसास्थळे निर्माण करण्याची गरज '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पुणे - ""वाढत्या शहरीकरणात नागरिकांनी एकत्रित येऊन नवनव्या संकल्पनांवर विचारविनिमय करावा, यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणे, हेच आगामी काळात शहर नियोजनातील सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. तसेच आगामी पिढीसाठी नव्याने वारसास्थळे निर्माण करण्याची गरज आहे,'' असे मत राज्य नगरविकास विभागाचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले. 

पुणे - ""वाढत्या शहरीकरणात नागरिकांनी एकत्रित येऊन नवनव्या संकल्पनांवर विचारविनिमय करावा, यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणे, हेच आगामी काळात शहर नियोजनातील सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. तसेच आगामी पिढीसाठी नव्याने वारसास्थळे निर्माण करण्याची गरज आहे,'' असे मत राज्य नगरविकास विभागाचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले. 

जनवाणी आणि इन्टॅक यांच्यातर्फे आयोजित सहाव्या पुणे हेरिटेज फेस्टिव्हलचे उद्‌घाटन गुरुवारी झाले. या वेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, मुंबईच्या वास्तुविशारद आभा लांबा, "इन्टॅक'चे निमंत्रक श्रीकांत निवसरकर, जनवाणीचे विश्वस्त आणि उद्योजक अरुण फिरोदिया, विश्‍वस्त विशाल जैन उपस्थित होते. 

डॉ. करीर म्हणाले, ""सध्या असलेला वारसा तर जपायलाच हवा; त्याचबरोबर पुढच्या पिढीचा विचार करत भविष्यासाठी नवीन वारसा तयार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नव्याने सार्वजनिक जागा तयार करून त्याला वारसास्थळाचा दर्जा मिळेल आणि तेथे नागरिक एकत्र येतील, यासाठी प्रयत्न व्हावेत.'' 

लांबा म्हणाल्या, ""विकास आणि वारसास्थळांचे संवर्धन यातील समतोल राखूनच शहरी वारसा जपायला हवा. शहराचा अभिमान म्हणून वारसास्थळांकडे पाहायला हवे. या स्थळांची मालकी नागरिकांनी घ्यायला हवी. शहरातील वारसास्थळांचे जतन करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्‍यक आहे.'' 

या वेळी शहरी वारसा परिषदही झाली. त्यात "शहरी वारसास्थळांचे भविष्य आणि वारसा जतन विकास योजनांचे कायदे व संधी' विषयावर चर्चा झाली. अहमदाबादचे राजीव पटेल म्हणाले, ""जुने शहर ही एक प्रकारची गुंतवणूक होऊ शकते, परंतु त्यासाठी योग्य प्रकारे "मार्केटिंग' होण्याची गरज आहे. तसेच वारसास्थळांच्या संवर्धनासाठी मास्टर प्लॅन आणि ठोस नियमावली असायला हवी.'' 

शहरातील वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी "हेरिटेज फाउंडेशन' स्थापन करण्याची गरज आहे. अशा स्थळांच्या संवर्धनासाठी गेल्या वर्षी तीन ते चार कोटी रुपयांची तरतूद होती. या वर्षी 18 कोटी रुपयांची तरतूद आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात वारसा स्थळांसाठी मंजूर होणारा निधी फाउंडेशनमध्ये वर्ग करण्यात यावा. या फाउंडेशनच्या माध्यमातून स्थळांचे संवर्धन केले जाईल आणि यासाठी कायमस्वरूपी तरतुदीची सोय होईल. 
- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका 

Web Title: newly created heritage place to need