पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर येत्या चार दिवसांत कारवाई 

पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर येत्या चार दिवसांत कारवाई 

पुणे : बीएस्सी पेपरफुटीप्रकरणी येत्या चार दिवसांत दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी सात ते आठ तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असल्याचे विद्यापीठाच्या वतीने अधिसभेत सांगण्यात आले. 

अधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी या प्रकाराची दखल घेत स्थगन प्रस्ताव दाखल केला होता. यावर अधिसभा सदस्य डॉ. दिनेश नाईक म्हणाले की, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचा तृतीय वर्षाचा पेपर 17 ऑक्‍टोबर रोजी नाशिकच्या महाविद्यालयातून व्हायरल झाला होता, अशी माहिती प्राथमिक अहवालात आहे. या अहवालाबाबत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यावर चौकशी सुरू असून, पुढील चार दिवसांत दोषींवर कारवाई करण्यात येईल. 

पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी विविध क्षेत्रांतील सात ते आठ लोकांची तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती विद्यापीठाचा आयटी सेल बळकट करण्यासाठी मदत करणार असल्याचेही कुलगुरू डॉ. करमळकर यांनी नमूद केले. 

अध्यासनासाठी निधीची आवश्‍यकता 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन उभारण्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. त्यामुळे निधीची उपलब्धता झाल्यास प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासनाची निमिर्ती होऊ शकते. त्याला अडचण नाही, असे डॉ. नितीन करमळकर यांनी अधिसभेत सांगितले. अधिसभेचे सदस्य शशिकांत तिकोटे यांनी याबाबतचा ठराव मांडला होता. 

सायबर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणार 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक होणे आणि पेपरफुटी अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे अत्याधुनिक सायबर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस विद्यापीठाने अधिसभेत व्यक्त केला. विद्यापीठाचे सर्व्हर अगदी सहजपणे हॅक करणे शक्‍य होत आहे. एप्रिलमध्ये दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाचे पोर्टल हॅक करून पेपर फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे विद्यापीठाचा माहिती तंत्रज्ञान विभाग अधिक सक्षम करावा, असा मुद्दा सदस्यांनी मांडला. त्यावर परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, "या प्रकारच्या घटना आगामी काळात घडू नयेत म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.'' 

सायबर सिक्‍युरिटी ऑडिटबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, "विद्यापीठात आयटी विभाग आहे, परंतु त्यांच्या कामात सुधारणा व्हावी म्हणून नवीन समितीचे बळकटीकरण करण्यात येईल. त्यात खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या अधिसभेत राजेश पांडे यांनी विद्यापीठाचा लेखापरीक्षण अहवाल सादर केला. यावर चर्चा करून अधिसभेच्या सदस्यांनी अहवाल मंजूर केला.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com