'एनएचएआय' आता रिलायन्स इन्फ्राचे निलंबन करणार की मुदतवाढ देणार?

'एनएचएआय' आता रिलायन्स इन्फ्राचे निलंबन करणार की मुदतवाढ देणार?

खेड-शिवापूर : पुणे-सातारा महामार्गाच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रिलायन्स इन्फ्राला निलंबनाची नोटीस बजावली होती. या निलंबनाच्या नोटीसीचा निर्णय अजून 'एनएचएआय'च्या मुख्य कार्यालयाकडे प्रलंबित आहे. तर दुसरीकडे पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी रिलायन्स इन्फ्राने 'एनएचएआय'कडे मार्च 2021 पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे 'एनएचएआय' आता रिलायन्स इन्फ्राचे निलंबन करणार की मुदतवाढ देऊन रिलायन्स इन्फ्राला पाठीशी घालणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याची पहिली मुदत संपून सात वर्षे झाली आहेत. तसेच असुरक्षित रस्ता, त्यामुळे वेळोवेळी झालेली स्थानिक लोकप्रतिनिधींची आंदोलने याला जबाबदार धरत 'एनएचएआय'ने रिलायन्स इन्फ्राला निलंबनाची नोटीस बजावली होती. सुमारे पाच महिन्यांपूर्वी बजावलेल्या या निलंबनाच्या नोटीसीची प्रक्रिया अजून पुढे सरकली नाही. अजूनही या निलंबनाच्या नोटीसीचा निर्णय 'एनएचएआय'च्या वरीष्ठ कार्यालयाकडे प्रलंबित आहे. तर दुसरीकडे रिलायन्स इन्फ्राने पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या काम पूर्ण करण्यासाठी 'एनएचएआय'कडे मार्च 2021 पर्यंतची मुदत मागितली आहे. त्यामुळे रिलायन्स इन्फ्राला बजावलेल्या निलंबनाच्या नोटीसीवर 'एनएचएआय' काही निर्णय घेणार की मुदतवाढ देऊन रिलायन्स इन्फ्राला पाठीशी घालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस म्हणाले, "रिलायन्स इन्फ्राच्या निलंबनाच्या नोटीसीबाबतचा निर्णय 'एनएचएआय'चे वरिष्ठ कार्यालय घेणार आहे. तर रिलायन्स इन्फ्राने मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मागितली असून त्यांना मुदतवाढ द्यायची की नाही तोही निर्णयही आमचे वरिष्ठ कार्यालय घेणार आहे."

खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर म्हणाले, "रिलायन्स इन्फ्राला बजावलेल्या निलंबनाच्या नोटीसीवर कोणताही निर्णय झालेला नसताना 'एनएचएआय' रिलायन्स इन्फ्राच्या मुदतवाढीवर विचार करत आहेत. यावरून एनएचएआय रिलायन्स इन्फ्राला पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स इन्फ्राला मुदतवाढ दिल्यास टोलनाका हटाव कृती समिती तीव्र आंदोलन करेल."

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com