एनआयई एकांकिका स्पर्धेला भरभरून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक वारसा आहे. "सकाळ माध्यम समूहाचे उपक्रम हे नेहमीच स्त्युत्य असतात. एनआयई नाट्य स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुण साकारण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाली आहे. सकाळ एनआयई हे विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असते. या स्पर्धेतूनच उद्याचे व्यावसायिक कलाकार घडणार आहेत. 
- उद्योजक नीलेश ज्ञानदेव शिंदे (स्पर्धेचे मुख्य प्रायोजक) 

पिंपरी : विविध रंगबिरंगी वेशभूषा करून सकाळीच सभागृहात आलेले बालकलाकार, नाटक सादर करण्यासाठी प्रचंड उत्सुक दिसत होते. रोजच्या अभ्यासापेक्षा आपण काहीतरी वेगळे करत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यर्वर दिसत होता. अशा उत्साही वातावरणात बुधवार (ता. 28) "सकाळ एनआयई नाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन' झाले. 

निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृहात ही नाट्य स्पर्धा आयोजित केली. या उद्‌घाटनप्रसंगी स्पर्धेचे मुख्य प्रायोजक उद्योजक नीलेश ज्ञानदेव शिंदे, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या उपकेंद्र प्रमुख मनोज देवळेकर, पर्यवेक्षक सुधीर कुलकर्णी, परीक्षक प्रकाश पारखी, राजश्री राजवाडे-काळे व तुकाराम पाटील, शिवराज पिंपुडे, छाया पाखरे उपस्थित होते. 

या उदघाटनप्रसंगी देवळेकर म्हणाले,""प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या उत्कर्षासाठी संधी देणे गरजेचे आहे. "सकाळ एनआयई' नाट्य स्पर्धा व इतर अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना ही संधी मिळत आहे. नाट्य स्पर्धेतून मुलांमध्ये धाडसीपणा वाढतो. अशा नाट्यस्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालकांनी मुलांना आवर्जून प्रोत्साहन द्यावे.'' 

या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकाळ "एनआयई'चे सहाय्यक व्यवस्थापक विशाल सराफ यांनी केले. एनआयई समन्वयक अक्षया केळसकर, सुमीत जाधव यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन वर्षा जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी "सकाळ'च्या एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या उपक्रमांतर्गत सलग चार वर्षे या नाट्यस्पर्धेचे आयोजन केले जाते. 

शिकण्याची संधी मिळाली 
"सकाळ एनआयई'च्या नाट्य स्पर्धेत आम्हाला स्टेजवर जाण्याची, आपली कला दाखवण्याची व अभिनय सादर करण्याची संधी मिळाली. अभ्यास सांभाळून आम्ही नाटकाचा सराव केला, सरावा दरम्यान खूप मज्जा आली. अशा प्रतिक्रिया सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. 

एनआयईच्या या उपक्रमामुळे अभिनयाची संधी मिळाली. सभाधीटपणा व अभिनयाचे धडे या स्पर्धेमुळे मिळाले. वास्तव व काल्पनिक जीवन खऱ्या अर्थाने समजले. 
- प्रथमेश लोहार, नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी 

नाटकामुळे मोठ्या समूहासमोर बोलण्याचा आत्मविश्‍वास आला. पहिल्यांदाच व्यासपीठावर वावरण्याची संधी मिळाली खूप छान वाटले. 
- अक्षदा टाळके मनपा पुनावळे कन्या विद्यालय 

मागील दोन वर्षापासून मी एनआयई नाट्य स्पर्धेत सहभागी घेत आहे. या स्पर्धेमुळे आत्मविश्‍वास वाढला. पाठांतर व संवाद कौशल्ये विकसित झाली. त्यामुळे "सकाळ एनआयई' नाट्य स्पर्धेची दरवर्षी उत्सुकता असते. 
- अथर्व आसबे -ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी 

पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक वारसा आहे. "सकाळ माध्यम समूहाचे उपक्रम हे नेहमीच स्त्युत्य असतात. एनआयई नाट्य स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुण साकारण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाली आहे. सकाळ एनआयई हे विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असते. या स्पर्धेतूनच उद्याचे व्यावसायिक कलाकार घडणार आहेत. 
- उद्योजक नीलेश ज्ञानदेव शिंदे (स्पर्धेचे मुख्य प्रायोजक) 
 

Web Title: NIE plays for students to respond to competition from bubbling