निगडी-दापोडी बीआरटी आजपासून

निगडी-दापोडी बीआरटी आजपासून

पिंपरी - निगडी-दापोडी मार्गावरील बीआरटी बससेवा शुक्रवारपासून (ता. २४) सुरू होत असून, सुमारे एक लाखाहून अधिक प्रवाशांना जलदगतीने प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. निगडीपासून पुण्यातील बहुतेक सर्व प्रमुख भागांमध्ये प्रवाशांना बीआरटी बसमधून ये-जा करता येईल. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीतील पाचवी बीआरटी सेवा सुरू होत असून, त्यावर एकूण ६२३ गाड्या धावणार आहेत.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी बारा वाजता निगडी बसस्थानकावर याचे उद्‌घाटन होईल. मात्र, पहाटेपासून सर्व गाड्या बीआरटी मार्गावरून धावतील. त्यासाठी बसगाड्यांच्या संख्येतही वाढ केली आहे. पीएमपीच्या ११३ गाड्या, तर भाडेतत्त्वावरील १३९ गाड्या या मार्गावर नव्याने आणल्या असून, अन्य बीआरटी मार्गावरील २१ गाड्या अशा एकूण २७३ गाड्या या मार्गावर धावतील. सध्या या मार्गावरून धावणाऱ्या काही जुन्या गाड्या अन्य मार्गांवर पाठविल्या जातील. 
याबाबत पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक विलास बांदल म्हणाले, ‘‘दोन्ही बाजूंना दरवाजे असलेल्या बीआरटीच्या गाड्या या मार्गावर पाठविण्यात येतील. त्यासाठी सर्व डेपोंना जादा गाड्यांचा आराखडा करून दिला आहे. जुन्या गाड्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण केली. गाड्यांच्या दोन हजारपेक्षा अधिक फेऱ्या होतील.’’
पिंपरी चिंचवड महापालिकेने २०१३ मध्ये या मार्गावर बीआरटीचे बसथांबे व स्वतंत्र लेनचे काम सुरू केले. याबाबत काहीजण न्यायालयात गेल्यानंतर महापालिकेने आयआयटी पवई या संस्थेला सुरक्षिततेचे उपाय सुचविण्यास सांगितले. त्यांच्या अहवालानुसार सुरक्षिततेविषयक उपाययोजना करण्यात आल्या. उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर निगडी-दापोडी बीआरटी सुरू होत आहे. 

दोन प्रकारचे थांबे
अन्य बीआरटी मार्गावर बसथांबे रस्त्याच्या मध्यभागी आहेत. निगडी ते दापोडी मार्गावर बसथांबे उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे एकाच शहरात पीएमपीला दोन प्रकारच्या बीआरटी बसथांब्यांवर सेवा द्यावी लागेल. तीच गाडी मिश्र पद्धतीच्या मार्गावरून वाहतूक करताना प्रवाशांना डाव्या बाजूच्या दरवाजातून उतरावे लागेल.

मिश्र पद्धतीची वाहतूक
मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे निगडीकडून दापोडीकडे जाताना संत मदर तेरेसा उड्डाण पूल ते खराळवाडी या दरम्यान बीआरटी बसगाड्या अन्य वाहनांसोबत धावतील. त्याच पद्धतीने दापोडीकडून निगडीकडे जाताना कासारवाडी व नाशिकफाटा येथे सुमारे एक किलोमीटर अंतरातही बीआरटीच्या गाड्या अन्य वाहनांसोबत धावतील. तसेच दापोडी येथेही मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथे मिश्र पद्धतीची बीआरटी असेल. तेथे प्रवाशांसाठी स्वतंत्र बसथांबे उभारण्यात येतील. 

बीआरटीमुळे जलदगतीने प्रवास करता येऊ शकेल. या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. मेट्रो सुरू होण्यास सुमारे चार-पाच वर्षांचा कालावधी लागेल. या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीचे जाळे निर्माण होईल व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होईल. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com