निगडी आयटीआयमध्ये तीन नवीन अभ्यासक्रम

आशा साळवी
गुरुवार, 17 मे 2018

पिंपरी - निगडीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) यंदापासून संगणक प्रशिक्षणासह तीन नवीन अभ्यासक्रम सुरू होत असून, अन्य पाच ट्रेडमध्येही सहा नवीन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. नव्या वर्गांमुळे यंदा ९३३ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळेल.

पिंपरी - निगडीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) यंदापासून संगणक प्रशिक्षणासह तीन नवीन अभ्यासक्रम सुरू होत असून, अन्य पाच ट्रेडमध्येही सहा नवीन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. नव्या वर्गांमुळे यंदा ९३३ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळेल.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कुशल कामगारांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे, आयटीआय प्रशिक्षितांना तातडीने रोजगाराची संधी उपलब्ध होते. आयटीआयमधील सध्याच्या १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (ट्रेड) ३६ तुकड्यांमध्ये ७३६ विद्यार्थी आहेत. या अभ्यासक्रमांसाठीही सध्याच्या जुन्या यंत्रांच्या जागी नवीन यंत्रसामग्री आणण्यावर भर देण्यात येत आहे.  

आयटीआयमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (कोपा), पेंटर, मोटार मेकॅनिकल, असे तीन नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. प्रत्येक ट्रेडमध्ये १६ ते २२ जणांची एक तुकडी असेल. त्यामुळे यंदा २५७ जादा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. नव्या अभ्यासक्रमांसाठी १२ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.

जुना अभ्यासक्रमासाठी जादा तुकड्या
 ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टूल्स मेंटनन्स    एक 
 आरेखक (स्थापत्य )    दोन
 मशिनिस्ट ग्राइंडर (घर्षक)    एक
 कातारी (टर्नर)    एक
 सर्व्हेक्षक    एक

‘कोपा’मध्ये मुलींसाठी आरक्षण
कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (कोपा) या अभ्यासक्रमामध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल, बेसिक हार्ड वेअर, प्रस्तुती आणि ग्राफिक पॅकेज, टॅली, डेटाबेस मॅनेजमेंट, बॅंकिंग, डाटा एन्ट्री ऑपरेटर, ॲडमिन, एमएस ऑफिस, नेटवर्किंग, इंटरनेट ब्राउजिंग शिकविण्यात येणार आहे. त्यासाठी आयटीआयमध्ये २२ संगणक उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात खेड आणि औंध आयटीआयमध्ये दहावी उत्तीर्णांना ‘कोपा’चे प्रशिक्षण दिले जाते. या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी २६ जणांना प्रवेश दिला जाणार असून, त्यात मुलींसाठी ३३ टक्के आरक्षित जागा आहेत. दहावीचा निकाल लागल्यावर admission. dvet. gov. in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत, अशी माहिती प्राचार्य एस. आर. खडतरे यांनी दिली.

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी अद्ययावत अभ्यासक्रम शिकविण्यावर आम्ही भर देत आहोत. यंदा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर अभ्यासक्रम सुरू करीत आहोत. त्याचबरोबर नेहमीच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी संख्या वाढवीत आहोत.
- एस. आर. खडतरे, प्राचार्य, निगडी शासकीय आयटीआय

Web Title: Nigdi ITI New Syllabus Education