थुंकणाऱ्यांना कोण अडविणार?

Spit
Spit

निगडी - शहरात अनेक ठिकाणी थुंकणारे दिसतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याने जंतुसंसर्ग आणि रोगराई पसरते, याचे भान नसते. कुचकामी कायदा अन्‌ अंमलबजावणी यातून थुंकणाऱ्यांचे फावते.  स्वयंशिस्तीचा अभाव आणि बेपर्वाई यांना आळा घालण्यासाठी कायदा करून भागणार नाही, तर सामाजिक जागृती आणि दबाव गट निर्माण होण्याची गरज आहे; अन्यथा सामाजिक स्वास्थ्यापुढे जटिल प्रश्न भविष्यात निर्माण होईल, हे नक्की. 

प्रसंग पहिला
स्थळ - नाशिक फाटा सिग्नल, वेळ सकाळी ९.३०
सिग्नलला सर्व वाहने उभी होती. एक तरुण गाडीची काच खाली करून रस्त्यावरच थुंकतो. शेजारील दुचाकीवाला त्यास म्हणतो, ‘दिसता सुशिक्षित मात्र, कुठे थुंकावे हे कळत नाही का?’ निर्विकार चेहऱ्याने थुंकणारा ‘सॉरी’ म्हणतो. गाडीची काच वर घेतो, जसे काही घडलेच नाही.

प्रसंग दुसरा
स्थळ - टिळक चौक, निगडी दुपारी १
दुचाकीवर चौकात तिघे जण तरुण. तोंडात गुटखा. रहदारीच्या चौकात तिघांच्याही पिचकाऱ्या. ते पाहून एक ज्येष्ठ व्यक्ती बोलती झाली, ‘ए पोरांनो, असे रस्त्यावर थुंकता का?’ त्यावर उत्तर होते, एव्हढेच वाईट वाटतेय तर शर्ट काढ आणि पुसून घे. अक्कल नको शिकवू.’

तिसरा प्रसंग
स्थळ - राजगुरुनगर-पुणे एसटी बस

तंबाखू मळतच चालक एसटी बसमध्ये बसतो. थोडे अंतर गेल्यावर केबिनमध्ये पायापाशीच थुंकतो. ठराविक वेळेनंतर पुन्हा तेच. न राहून गाडीत का थुंकता?, असे विचारल्यावर ‘मग कुठं थुंकायचं’, 
असे उत्तर.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे परिणाम - क्षयरोग, न्यूमोनिया, स्वाइन फ्लू, श्वसनाचे आजार, पचनसंस्थेचे आजार, कर्करोग, पुनरुत्पादन क्षमता कमी होणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान.

कायदा - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, थुंकणे, तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन, जाहिरात, साठवण, पुरवठा, विक्री करण्यास 
बंदी.

महापालिका कायदा - सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करण्यास मनाई. दंडनीय कारवाईची तरतुदीसोबतच संबंधितांकडून खर्च वसूल करता येतो. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार स्वच्छता विभागाला कारवाईचे अधिकार. 

हे गंभीर - सरकारी आकड्यानुसार भारतात दरवर्षी क्षयरोगाच्या १९ लाख नवीन केसेस नोंदवल्या जातात. जगात भारतामध्ये क्षयरोगाचे रुग्ण सर्वांत जास्त आढळतात.

थुंकणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, त्यांच्यावर लक्ष ठेवून पकडणार कसे, हा प्रश्न आहे. थुंकणाऱ्यांवर अद्याप पालिकेकडून कारवाई झालेली नाही. परिसर स्वच्छ असेल तर थुंकणाराही विचार करील. त्यामुळे स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी आहे, हे भान प्रत्येकाने बाळगणे गरजेचे.
मनोज लोणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग, महापालिका

आळा कसा बसणार?
कडक कायदा 
कायद्याची/कारवाईची प्रभावी अंमलबजावणी हवी
सामाजिक भान व स्वयंशिस्त प्रत्येकात हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com