शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत रात्रशाळा 

मीनाक्षी गुरव 
रविवार, 28 एप्रिल 2019

तिकूल परिस्थितीत दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी शिक्षण घेणाऱ्यांसाठी "रात्रशाळा' म्हणजे ज्ञान मंदिरच ठरते. परंतु, आता पुरेसे शिक्षक नसल्यामुळे या रात्रशाळा ओस पडू लागल्या आहेत.

पुणे : प्रतिकूल परिस्थितीत दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी शिक्षण घेणाऱ्यांसाठी "रात्रशाळा' म्हणजे ज्ञान मंदिरच ठरते. परंतु, आता पुरेसे शिक्षक नसल्यामुळे या रात्रशाळा ओस पडू लागल्या आहेत. राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी हिरवा कंदील दिला असला, तरीही या शाळांमधील शिक्षक भरती अद्यापही लाल फितीत अडकली आहे.

परिणामी, अपुऱ्या शिक्षकांच्या जोरावर शाळा चालविण्याची धडपड सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळते. शिक्षकांच्या भरतीअभावी रात्रशाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात येण्याची चिन्हे आहेत. राज्यातील जवळपास 165 रात्रशाळांमध्ये सुमारे 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांसाठी साडेसातशेहून अधिक शिक्षकांची पदे मंजूर असून, सध्या बहुसंख्य पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शिक्षक भरतीप्रक्रियेतून रात्रशाळांमधील शिक्षकांच्या भरतीला बाजूला ठेवले आहे. ही भरती निवडणुकीनंतर सुरू होण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे सध्या अपुऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जोरावर रात्रशाळांचा डोलारा सांभाळला जात आहे. रात्रशाळांमध्ये नवीन भरती करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. तसेच तात्पुरत्या आणि अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षक म्हणून परवानगी द्यावी, ही मागणी सरकार दफ्तरी प्रलंबित आहे. राज्यातील 165 रात्रशाळांपैकी 50हून अधिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालये जोडलेली आहेत. परंतु पुरेसे शिक्षक नसल्यामुळे एका शिक्षकाला दोन ते तीन विषय शिकवावे लागत आहेत, तर गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी हे गणित, विज्ञान आणि भाषा विषयांना शिक्षक नसताना परीक्षा देत आहेत. 

"रात्रशाळेच्या शिक्षकांना पूर्णवेळ म्हणून मान्यता मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्यातील रात्रशाळांमधील शिक्षकांच्या भरतीचा प्रश्‍न गंभीर असतानाही, पवित्र पोर्टलमध्ये त्याचा समावेश नाही. अनेक शाळांमध्ये गणित, इंग्रजीसाठी शिक्षक नसताना विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रात्रशाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागण्यात आली होती, परंतु ती अद्याप मान्य केलेली नसल्यामुळे शाळांचे भवितव्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.'' 
- सतीश वाघमारे, प्राचार्य, चिंतामणी रात्रप्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय 

"रात्रशाळेतील शिक्षक हे अर्धवेळ किंवा तासिका तत्त्वावर काम करतात. राज्यातील काही अतिरिक्त शिक्षकांचे रात्रशाळेतील रिक्त जागांवर यापूर्वीच समावेशन केले आहे. सध्याच्या चालू असलेल्या भरतीप्रक्रियेनंतर आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या भरतीप्रक्रियेत या शिक्षकांचा समावेश केला जाईल.'' 
- विशाल सोळंकी, राज्य शिक्षण आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Night School waiting for teacher recruitment